ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री आजम खान यांना लक्ष्य करताना भाजपावर निशाणा साधला आहे. ‘मला चहा बनवता येतो, चांगले कपडे घालता येतात आणि ड्रमही वाजवता येतो. त्यामुळे मी पंतप्रधान होऊ शकतो,’’ असे तोंडाचे डबडे वाजवून आजम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे.
एरवी मुंबईतील काही टिनपाट लोक ऊठसूट शिवसेनेवर टीका करीत आहेत. वातानुकूलित चेंबरमध्ये बसून शब्दांचे तोबरे सोडायला अक्कल लागत नाही, पण या टिनपाट लोकांनी आजम खान यांच्यासारख्यांना अंगावर घेण्याची हिंमत दाखवायला हवी.
आजम खान मोदी यांची खिल्ली उडवीत आहेत व लखनौ-मुंबईचे भाजपवीर शिवसेनेवर टीका करण्यात जीवनाचे सार्थक मानीत आहेत. मोदींची खिल्ली उडवणा-या आजम खानची जीभ हासडून बाहेर काढण्याची हिंमत भाजप पदाधिकार्यांत आहे काय? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- आजम खान मोदी यांची खिल्ली उडवीत आहेत व लखनौ-मुंबईचे भाजपवीर शिवसेनेवर टीका करण्यात जीवनाचे सार्थक मानीत आहेत. मोदी यांनी चहा विकता विकता देशभक्ती केली. आजम खान यांनी उलटे केले. या देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल, सर न्यायाधीश अनेकदा मुसलमान झाले व त्यांनी उत्तम काम केले. आजम खान यांनी हे सर्व लक्षात घेतलेले दिसत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला असे जरी असले तरी आजम खानची जीभ हासडून बाहेर काढण्याची हिंमत भाजप पदाधिकार्यांत आहे काय?
- मुंबईतील काही टिनपाट लोक ऊठसूट शिवसेनेवर टीका करीत आहेत. वातानुकूलित चेंबरमध्ये बसून शब्दांचे तोबरे सोडायला अक्कल लागत नाही, पण या टिनपाट लोकांनी आजम खान यांच्यासारख्यांना अंगावर घेण्याची हिंमत दाखवायला हवी. आजम खान यांनी पंतप्रधान मोदी यांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष केले आहे. ‘‘मला चहा बनवता येतो, चांगले कपडे घालता येतात आणि ड्रमही वाजवता येतो. त्यामुळे मी पंतप्रधान होऊ शकतो,’’ असे तोंडाचे डबडे वाजवून आजम खान यांनी पंतप्रधानांची खिल्ली उडवली आहे. देशाच्या पंतप्रधानांची अशी खिल्ली उडवणे योग्य नाही, पण आजम खान यांच्यासारख्यांच्या डोक्यावर फरकॅप असली तरी टोपीखालच्या कवटीत मेंदू नाही
- पंतप्रधान होण्यासाठीची योग्यता काय याचा पाढा आजम खान यांनी वाचला. पण देशभक्ती हा सर्वात मोठा गुण रक्तात भिनावा लागतो, जो मोदींच्या रक्तात आहे. आजम मियाँच्या रक्तात तो आहे काय ते सांगता येणार नाही. मुसलमानांचे नेतृत्व करायला हरकत नाही. कारण राजकारणात हीच त्यांची रोजीरोटी आहे, पण ऊठसूट मुसलमानांची माथी भडकवून आगी लावायच्या व त्यावर राजकीय ‘कबाब’ भाजून घ्यायचा हा अतिरेक आहे. आजम खान त्या प्रकारचे अतिरेकी आहेत. आजम खान कधी पाकिस्तानचे गोडवे गातात तर कधी हिंदुस्थानातील मुसलमान असुरक्षित असल्याची बांग ठोकत ‘युनो’ला साकडे घालतात. हा सरळ सरळ देशद्रोहच आहे.
- पंतप्रधान मोदी हे चहावाले जरूर असतील, पण आजम खानप्रमाणे बिनडोक आणि धर्मांध नक्कीच नाहीत. एक चहा विकणारा सामान्य माणूस देशाचा पंतप्रधान होतो हा आपल्या लोकशाहीचा व सामान्य जनतेचा विजय आहे. पंतप्रधानांनी चांगले कपडे घालणे हा गुन्हा नाही. शिवाय देश तसा वेश या न्यायाने एखाद्या समुदायात सहभागी होत पंतप्रधानांनी त्यांच्या परंपरागत नाचगाण्यात सामील होणे किंवा वाद्य वाजवणे हादेखील टीकेचा विषय होऊ शकत नाही. पंडित नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी यांनी हे सर्व वेळोवेळी केले आहे. त्यामुळे आजम खान यांचा निशाणा साफ चुकला आहे. पंतप्रधान झालो तर प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात २५-२५ लाख जमा करीन, अशी कोपरखळी आजम खान यांनी मारली. ती भाजप पुढार्यांना झोंबणारी आहे. कारण सत्तेवर येताच सर्व काळाबाजारवाल्यांना धडा शिकवू, परदेशी बँकांतील लाखो कोटींचे काळे धन परत आणून जनतेच्या बँक खात्यात १५ लाख जमा करू, असे वचन मोदी यांनी दिले होते व आजम खानसारखे बेरकी त्यावरच प्रश्न विचारीत आहेत.
- या प्रश्नाचे उत्तर शिवसेनेवर आंधळेपणाने टीका करणार्यांकडे नसावे. तसे ते असते तर छातीवरची बटणे तुटेपर्यंत दीर्घ श्वास घेऊन त्यांनी आजम खानला दम भरला असता, पण आजम खान मोदी यांची खिल्ली उडवीत आहेत व लखनौ-मुंबईचे भाजपवीर शिवसेनेवर टीका करण्यात जीवनाचे सार्थक मानीत आहेत. मोदी यांनी चहा विकता विकता देशभक्ती केली. आजम खान यांनी उलटे केले. त्यामुळे ते उत्तर प्रदेशच्या राजकारणातील खलनायक ठरत आहेत. आपण मुस्लिम आहोत हा एकच माझा कमकुवतपणा आहे असे त्यांनी सांगणे हा देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा अपमान आहे. या देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल, सरन्यायाधीश अनेकदा मुसलमान झाले व त्यांनी उत्तम काम केले. आजम खान यांनी हे सर्व लक्षात घेतलेले दिसत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला असे जरी असले तरी आजम खानची जीभ हासडून बाहेर काढण्याची हिंमत भाजप पदाधिकार्यांत आहे काय?