- पंकज पाटील नातवंडांना गोष्टी सांगण्याच्या वयात शाळेची चाहूल लागलेल्या २८ आजीबाईंची शाळा मुरबाडच्या फांगणे गावात भरत आहे. उतरत्या वयाची चिंता न करता या सर्व आज्या आनंदाने शिक्षण घेत आहेत. आजीबाईच शिक्षणाच्या प्रवाहात आल्याने संपूर्ण परिसरात शिक्षणाविषयी सहजपणे जनजागृती झाली आहे. मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी हिरव्यागार निसर्गरम्य परिसरात वसलेले फांगणे गाव. अनेक सुविधांपासून वंचित असलेले हे गाव कोणतीही तक्रार न करता, आहे त्या परिस्थितीचा सामना करत आपले जीवन जगत आहे. मात्र, या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक योगेंद्र बांगर यांनी या गावात शिक्षणाची चळवळ सुरू केली. गावातील प्रत्येक मुलगा शाळेत यावा, ही इच्छा बाळगत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. संपूर्ण गाव साक्षर करावे, ही इच्छा प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. याच प्रयत्नातून आकारास आली, ती आजीबार्इंची शाळा... गावात २८ वयोवृद्ध महिला या अशिक्षित होत्या. त्यांना साधी अक्षराचीदेखील ओळख नव्हती. या सर्व आजीबार्इंना साक्षर करण्याचा संकल्प करून त्यांची दररोज शाळा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळेल का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, सर्व आजीबार्इंना एकत्रित करून त्यांना शिक्षणाविषयी महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच शिक्षण हे कोणत्याही वयात घेता येते, हे पटल्यावर या सर्व आजीबार्इंनी न लाजता शाळेत येण्याचा निर्णय घेतला. आजीबार्इंनी शिक्षण घेण्याचे कबूल केल्यावर त्यांचा गणवेश आणि दप्तर निश्चित करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आजीबार्इंची शाळा फांगणे गावात भरवण्यात आली. एकाच रंगाची नऊवारी साडी आणि हातात दप्तर घेऊन या सर्व आजीबाई दररोज दुपारी २ ते ४ शाळेत येतात. सुरुवातीला वर्ग सुरू असताना वर्गाचे दार बंद ठेवले जायचे. मात्र, नंतर शिक्षणाविषयी गोडी निर्माण झाल्यावर या वर्गाचे दार खुले ठेवले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या आजीबार्इंकडे कुतूहलाने बघू लागले. कुणाची आई, तर कुणाची आजी शाळेत जाते, याचा अभिमान प्रत्येक ग्रामस्थाला वाटू लागला. स्त्री शिक्षणाची चळवळ व्यापक होऊन महिला शिक्षणाकडे वळल्या असल्या, तरी आजही एक पिढी अशिक्षित आहे. त्यांच्या काळात त्यांना शिक्षण घेता आले नाही. मात्र, अशा साठीनंतरच्या पिढीला शिक्षित करण्याची मुहूर्तमेढ ही मुरबाडमधील अतिदुर्गम अशा ग्रामीण भागात झाली, याचा सार्थ अभिमान ग्रामस्थांना आहे. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या शाळेतील सर्व २८ आजीबार्इंना अक्षरांची ओळख पटली असून आकडेमोडही त्या सहज करतात. मोतीराम गणपतदादा चॅरिटेबल ट्रस्ट आणि फांगणे जिल्हा परिषद शाळेच्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. या शाळेतील प्रत्येक आजीबाई आज कोणत्याही सरकारी कामासाठी स्वाक्षरी म्हणून हाताचा अंगठा न वापरता आता स्वत:ची स्वाक्षरी आनंदाने करते. त्यांची हीच स्वाक्षरी त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत करत आहे. आज या गावातील आजी केवळ शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या नसून गावातील प्रत्येक सामाजिक उपक्रमात अग्रक्रमी राहण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. शिक्षणाच्या गोडीमुळे त्यांचा उत्साह हा प्रचंड वाढला आहे. हातातील काम बाजूला ठेवून शाळेत दोन तास घालवण्याचा जणू छंद त्यांना लागला आहे. अनुभवातून आपल्या नातवंडांना गोष्टींच्या स्वरूपात संस्कारांचे धडे शिकवण्यात आमचा वेळ जात होता. आता हीच नातवंडे आज घरात आमचा अभ्यास घेतात. आम्हाला अक्षरांसोबत खेळण्यास भाग पाडतात. हे पाहिल्यावर मन भरून येते. आजीला आपण शिकवत आहोत, हा आनंद नातवंडांच्या चेहऱ्यावर दिसतो. - कांताबाई मोरेघरची परिस्थिती गरिबीची असल्याने लहानपणी शाळेत जाऊ शकले नाही. पण, ती इच्छा वयाच्या ८५ व्या वर्षी पूर्ण होत आहे. आज शिक्षण घेताना लहानपणी जे हरवले होते, ते आता मिळाल्याचा आनंद होत आहे. - सुभद्रा नामदेव देशमुख अशिक्षित आजींना शिकवून किमान एकदा तरी त्यांना सुशिक्षित असण्याचा अनुभव आम्हाला त्यांना द्यायचा होता. याच संकल्पनेतून आम्ही ही शाळा सुरू केली आहे. आता ही मोहीम राज्यभर राबवणे गरजेचे आहे. - योगेंद्र बांगर, शिक्षक
आजीबार्इंना लागली शिक्षणाची गोडी
By admin | Published: August 16, 2016 4:37 AM