मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येणारी बी. फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली आहे. महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याची वेळ सीईटी सेलवर आली आहे. त्यामुळे फार्मसीची प्रवेश प्रक्रिया कधी पूर्ण होणार हा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने फार्मसी महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया यंदा ३१ ऑक्टोबरपर्यंत राबविण्याचे निर्देश फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय)ला दिले होते. तसेच या महाविद्यालयांना मान्यता प्रक्रियेवर हरकती अथवा सूचना देण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत दिली होती. त्यानुसार यंदा ‘पीसीआय’ने ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश विविध राज्य सरकारांच्या प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या प्राधिकरणांना दिले आहेत. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.
परिणामी, ‘पीसीआय’ने मान्यता देऊनही आचारसंहितेमुळे राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून नव्या महाविद्यालयांना मान्यता दिली नाही. त्यामुळे या महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होऊ शकत आहे. ‘पीसीआय’ने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांचा समावेश प्रवेश प्रक्रियेत करावा लागणार असल्याने राज्य सरकारची अडचण झाली आहे. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रियेलाच स्थगिती देण्याची वेळ सीईटी सेलवर आली आहे.
सध्या दोन फेऱ्यांत २१ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश सद्य:स्थितीत बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या दोन फेऱ्यांमध्ये २१ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ४९७ महाविद्यालये सहभागी झाले असून, त्यांच्याकडे ४२ हजार २३३ जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी ५० हजार ११७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे अद्यापही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी असल्याने या प्रवेशांना विलंब होणार आहे.