प्रमोद सुकरे-- कऱ्हाड -भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले सध्या पक्षाच्या वतीने जर्मन दौऱ्यावर आहेत. तर दक्षिणच्या राजकीय पटलावर आपले स्थान भक्कम करू पाहत असलेले दुसरे युवानेते अॅड. उदय पाटील कुस्ती फडाच्या उद्घाटनानिमित्ताने हजेरी लावताना दिसत आहेत. त्यामुळे दक्षिणच्या राजकीय फडात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही राजकीय व समाज कार्यातील नेत्याला आपल्या मुलाने आपला वारसा पुढे चांगल्याप्रकारे चालवावा, असेच वाटत असते. त्याला डॉ. सुरेश भोसले व विलासराव पाटील-उंडाळकर परिवारही अपवाद नाहीत. आम्ही चालवू हा पुढे वारसा, म्हणत डॉ. अतुल भोसलेंनी एकदा उत्तरेत तर एकदा दक्षिणेत नशीब आजमावले. ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ म्हणत त्यांची तयारी सुरूच आहे. विलासराव पाटील-उंडाळकरांचे राजकीय वारसदार म्हणून अॅड. उदय पाटील यांच्याकडे पाहिले जाते खरे; पण त्यांचा राजकीय ‘उदय’ करायला काकांना जरा उशीरच झाल्याची कार्यकर्त्यांच्यात चर्चा आहे. म्हणजे झालं कसं, विलासराव काकांनी सलग सातवेळा कऱ्हाड दक्षिणेतून विजय संपादन केला. एकदा ते कॅबिनेट मंत्रीही झाले. त्यामुळे उदय पाटलांना फडात उतरविण्याचा योगच आला नाही. खरंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत उदय पाटील यांचं दक्षिणेतील ‘लाँॅचिंग’ केलं असतं तर तो ‘टायमिंग शॉट’ चांगला बसला असता. कारण शिवसेनेचा कमलाकर सुभेदार हा पाहुणा उमेदवार मुंबईहून दक्षिणेत आयात करण्यात आला होता; पण त्यावेळी काका पक्षातील ज्येष्ठ आमदार होते.त्यांना मंत्रीमंडळात चांगली संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. दक्षिणेतील त्यांचे समर्थक तर काकांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे सांगत होते. त्यामुळे उदय दादांच्या राजकीय ‘लाँचिंग’चा योग जुळून आला नसावा. २0१४ मध्ये काँग्रेसने विलासराव पाटील यांच्या उमेदवारीला कात्री लावत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी निश्चित केली. त्यावेळी उदय पाटलांना बंडखोरीची संधी होती. मात्र नाईलाजाने ती काकांनाच करावी लागली. विधानसभेतील उंडाळकरांच्या पराभवानंतर मात्र अॅड. उदय पाटील कराड दक्षिणच्या राजकारणात चांगलेच सक्रिय झालेले दिसतात. कारण त्यानंतर अॅड. उदय पाटील व डॉ. अतुल भोसले या दक्षिणेतील दोन युवा नेत्यांच्यात नव्या मैत्रीपर्वाला सुरुवात झाली. त्यानंतर कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत या मैत्रीपर्वाने यश मिळवत भोसलेंच्या हाती कृष्णेच्या चाव्या दिल्या. तर बाजार समितीची सत्ता हस्तगत करण्यात उंडाळकरांना भोसले गटाची मोलाची मदत मिळाली. कदाचित वर्षभरावर येऊन ठेपलेल्या कऱ्हाड पालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकाही ते एकत्रित लढतील. पण विधानसभेच्या फडात मैत्रीपर्वाचा नेमका उमेदवार कोण? हा कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे. सध्या तालुक्यात यात्रांचा हंगाम सुरू आहे. नुकतीच नांदगावची यात्रा झाली. या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती फडाच्या उद्घाटनासाठी अॅड. उदय पाटील व डॉ. अतुल भोसले दोघांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र भोसले परदेश दौऱ्यावर असल्यामुळे ते अनुपस्थित होते. मग उदयदादांच्या हस्ते फडाचा नारळ फोडण्यात आला. बहुदा त्यांनी पहिल्यांदाच कुस्ती फडाचे उद्घाटन केल्याचे कार्यकर्ते सांगतात. त्यानंतर मुठ्ठलवाडीची यात्रा झाली. तिथंही कुस्ती फडाचं उद्घाटन उदयदादांच्या हस्तेच झाले. त्यामुळे कऱ्हाड दक्षिणच्या राजकीय फडात उदयदादा नक्कीच आहेत, अशी चर्चा त्यांच्या कार्यक र्त्यांच्यात सुरू झाली आहे. दोघांच्याही युवा संघटना सध्या राजकारणात युवा शक्तीला महत्त्व आले आहे. याचाच विचार करून डॉ. अतुल भोसलेंनी आपली राजकीय वाटचाल करताना पहिल्यांदा युवा संघटना स्थापन केली. मात्र दोन्ही निवडणुकीत ही युवा शक्ती त्यांना विजयापर्यंत पोहोचवू शकली नाही. त्याच पध्दतीने अॅड. उदय पाटील यांची युवा संघटनाही सक्रिय झाली आहे. ही संघटना उदयदादांना कितपत यश मिळवून देणार हे पाहावे लागेल. लग्न समारंभानाही हजेरीआगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील हे दोन्ही युवा नेते कार्यकर्त्यांच्या निमंत्रणावरून गावोगावी होणाऱ्या विवाह सोहळ्यांना हजेरी लावताना दिसत आहेत. त्यामुळे या दोघांचाही हेतू समजून यायला कार्यकर्त्यांना वेळ लागत नाही.
‘बाबा’ परदेशात; ‘दादा’ दक्षिणच्या फडात!
By admin | Published: December 15, 2015 9:33 PM