योगगुरू रामदेव बाबा यांनी ठाण्यात आयोजित योग शिबिरात महिलांच्या कपड्यांवरून वादग्रस्त विधान केलं. यानंतर त्यांच्यावर सडकून टीका झाली होती. अनेक स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला होता. आता यानंतर बाबा रामदेव यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.
बाबा रामदेव यांच्या वक्तव्यानंतर महिला आयोगाकडूनही त्यांना नोटिस पाठवण्यात आली होती. तसंच त्यांना दोन दिवसांमध्ये यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर कर यांनी बाबा रामदेव यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचं पत्र ट्वीट केलं आहे. “बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटिस पाठवली होती ,याबाबतीत त्यांचा खुलासा आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागितली आहे,” असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.
काय म्हणालेत बाबा रामदेव?"महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी मी नेहमीच महिला सक्षमीकरणासाठी काम केले आहे. केंद्र सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' उपक्रमांतर्गत विविध धोरणांना मी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. यावरून हे स्पष्ट आहे की माझा महिलांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि सोशल मीडियावर आलेली क्लिप संदर्भाबाहेरील आहे,” असं बाबा रामदेव यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलेय.
“कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. माझ्या वक्तव्यामुळे ज्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची मी बिनशर्त माफी मागतो,” असंही त्यांनी नमूद केलंय.