Baba Siddique Murder : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची काल(13 ऑक्टोबर 2024) रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. गुरमेल बलजीत सिंग (23, रा. हरियाणा) आणि धर्मराज राजेश कश्यप (19, रा. बहराईच, यूपी) अशी पकडलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. तर तिसरा शूटर सध्या फरार आहे. शिवकुमार गौतम उर्फ शिवा (20 रा. बहराईच, यूपी) असे त्याचे नाव आहे.
मुंबईपोलिसांनीबाबा सिद्दिकींच्या हत्येला कॉन्टॅक्ट किलिंग म्हटले असून, या घटनेच्या सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीने या हत्येची जबाबदारी घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस त्या अँगलनेही तपास करत आहेत. सध्या आरोपींची माहिती गोळा करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला असता, दोन्ही आरोपींविरोधात जिल्ह्यात कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हरयाणाचा रहिवासी असलेल्या गुरमेल बलजीतवर यापूर्वी खुनाचा एक गुन्हा दाखल आहे.
आरोपी गरमेलने 2019 मध्ये त्याच्या मोठ्या भावाला बर्फाच्या सुईने भोसकून ठार मारले होते. गुरमेलचे आई-वडील हयात नाही, पण त्याची आजी फुलादेवी जिवंत आहे. आरोपीला एक लहान सावत्र भाऊदेखील आहे, जो त्याच्या आजीसोबत राहतो.
5 वर्षापूर्वी पुण्यात मजुरी करायला आलेला...
इतर आरोपींबद्दल सांगायचे तर, धर्मराज कश्यप आणि शिवकुमार उर्फ शिवा गौतम, हे दोघेही मजुरीचे काम करण्यासाठी पुण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे. शिवा पुण्यात एका भंगार विक्रेत्याकडे 5 ते 6 वर्षे काम करत होता. शिवानेही काही महिन्यांपूर्वी धर्मराजला पुण्याला कामानिमित्त बोलावले होते. सुपारी देणाऱ्या व्यक्तीने गुरमेलची शिवा आणि धर्मराज यांच्याशी ओळख करून दिली होती. मात्र, दोघेही पुण्याहून मुंबईत कसे पोहोचले आणि त्यांनी बाबा सिद्दिकी यांची माहिती कशी मिळवली, त्याचा तपास गुन्हे शाखा करत आहे.
12 ऑक्टोबरच्या रात्री नेमके काय झाले?पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 9:15 ते 9:30 च्या दरम्यान बाबा सिद्दिकी त्यांच्या कार्यालयाबाहेर गाडीत बसत होते, तेवढ्यात तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. बाबा सिद्दिकी यांच्या दिशेने सहा गोळ्या झाडल्या, ज्यातील एक त्यांच्या छातीत आणि दोन पोटात लागल्या. यानंतर त्यांना तातडीने वांद्रे (पश्चिम) येथील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी निर्मल नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.