Baba Siddique Murder : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची काल(12 ऑक्टोबर 2024) रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे, तर तिसरा सध्या फरार आहे. गुरमेल बलजीत सिंग (23, रा. हरियाणा) आणि धर्मराज राजेश कश्यप (19, रा. बहराईच, यूपी) अशी पकडलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. तर तिसरा शूटर शिवकुमार गौतम उर्फ शिवा (20 रा. बहराईच, यूपी) सध्या फरार आहे. याशिवाय, पोलिसांना आता चौथ्या आरोपीची माहिती मिळाली आहे.
चौथ्या आरोपीची ओळख पटलीपोलिसांच्या माहितीनुसार, मोहम्मद जसीन अख्तर, असे या चौथ्या फरार आरोपीचे नाव आहे. सध्या फरार आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी 10 पथके तयार केली आहेत. दरम्यान, आज दोन्ही आरोपींना न्यायालयात सादर केले असता, गुरमेल सिंगला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसऱ्या आरोपीने अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्याचे खरे वय शोधण्यासाठी बोन ओसीफिकेशन चाचणी केली जाणार आहे.
मोहम्मद जसीन अख्तर 7 जून रोजी पटियाला तुरुंगातून बाहेर आला बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथा आरोपी मोहम्मद जसीन अख्तर या वर्षी 7 जून रोजी पटियाला तुरुंगातून बाहेर आला होता. पंजाबच्या पटियाला तुरुंगातच तो लॉरेन्स बिश्नोई टोळीतील लोकांच्या संपर्कात आला होता. मोहम्मद जसीन अख्तर हा पंजाबमधील जालंधरचा रहिवासी आहे.
एका आरोपीने स्वत:ला अल्पवयीन म्हटलेया प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने न्यायालयात हजर केले. सुनावणीदरम्यान गुरमेल सिंगला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, धर्मराज कश्यपने अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. पण, बाबा सिद्दीकीच्या वतीने हजर झालेल्या वकिलाने धर्मराजच्या दाव्याचे खंडन केले आणि दोन्ही आरोपींची आधार कार्ड तपासण्याचे आवाहन केले. आधार कार्डनुसार गुरमेल 23 वर्षांचा तर कश्यप 21 वर्षांचा आहे. पण, बचाव पक्षाच्या वकिलाने धर्मराज अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद केला. यानंतर न्यायालयाने त्यांची बोन ओसीफिकेशन चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.