Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची रात्री तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली. एका तरुणाने फेसबुक पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी घेतली. ही पोस्ट अकोल्यातील शुभम लोणकर याने केल्याचे समोर आले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील रहिवासी असलेल्या शुभम लोणकर याच्या ब्रीद्रुक या गावी पोलीस पोहोचले असता घराला कुलूप असलेले आढळून आले त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते.
या हत्येप्रकरणात फेसबुक पोस्ट लिहून जबाबदारी स्वीकारणाऱ्याचे नाव शुभम लोणकर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, फेसबुकवर तो शुब्बू लोणकर असे आपले नाव लिहित आहे. या दृष्टिकोनातूनही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याआधीही फेब्रुवारी २०२४ मध्ये शुभमवर अवैध शस्त्र बाळगल्याचा आरोप होता. अकोला पोलिसांनी त्याच्याकडून तीन पिस्तूल आणि ११ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
शुभम लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावाही केला जात आहे. अकोला पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत.याबाबत अजून कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. याप्रकरणी अकोट विभागाचे एसीपी अमोल मित्तल यांनी सांगितले की, त्याची फेसबुक पोस्ट समोर आल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली आहे. रात्रीच आम्ही त्याच्या गावी जाऊन त्याच्या घराची झडती घेतली, मात्र फेसबुक पोस्ट त्याने की अन्य कोणी केली याबाबत सस्पेंस कायम असल्याचे त्यांनी सांगितले. असे असतानाही आम्ही या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहोत.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने याची जबाबदारी स्वीकारली
हत्येनंतर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने याची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये, टोळीने दावा केला आहे की त्यांना सलमान खानसोबत कोणतेही युद्ध नको होते, परंतु बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे कारण त्याचे दाऊद इब्राहिमशी असलेले संबंध होते. पण या फेसबुक पोस्टबाबत मुंबई पोलिसांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दिकी कार्यालयातून बाहेर पडून कारमध्ये बसले असताना तीन जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामधील दोघांना पकडण्यात आले आहे, तर एक फरार आहे. सिद्दिकी इफ्तार पार्ट्यांसाठी ओळखले जात होते.