Baba Siddique Shot Dead ( Marathi News ) : काल शनिवारी रात्री माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली. बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या हत्येनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबाबत भाष्य केले आहे.
"आता ही तरुण १०, २०, ५० हजार रुपयांसाठी हत्या करतात. यापाठिमागे खंडणी प्रकरण आहे. यामागे राजकारण अजिबात नाही. याच्यामागे काही व्यवहार किंवा खंडणी असा काहीतरी प्रकार आहे. पोलिसांना यातले सर्व कळतंय.या प्रकरणात पोलिसांना पूर्णपणे फ्री हॅन्ड दिला पाहिजे. मी तुमच्या पाठिमागे आहे असं सांगायला पाहिजे. पण जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांची विल्हेवाट लावा. पण ती फक्त गृहमंत्र्यांचीच नाही तर मुख्यमंत्र्यांचीही जबाबदार आहे, असं स्पष्ट मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं.
"योग्य अधिकारी कोण आहेत. हे पोलीस कमिशनर, डिजी यांना सगळं माहिती असतं. ते कोणाला घ्यायच नाही हे करतात पण, त्यांच्यावर जर आपण दबाव आणला तर ते कसं काम करणार?, असा सवालही छगन भुजबळ यांनी केला.
मुंबई पोलिसांना केली विनंती
"वाय प्लस सुरक्षा द्या नाहीतर झेड प्लस सुरक्षा द्या. आता बाहेरच्या राज्यातील तरुण १०, ५० हजारात सुपऱ्या देतात आणि पिस्तुल देऊन यांना मारुन या म्हणून सांगतात. ती मुल जिवावर उदार होऊन हे करतात. वाय सुरक्षा असेल तर पोलिस पाठिमागील गाडीत बसलेली असतात. नेहमी व्हिआयपी लोक पुढच्या सीटवर बसलेली असतात, त्यांना गाडीतच गोळ्या झाडल्या आहेत. मुळात सुरक्षा द्यायला पाहिजे पण, मुळात या पाठिमागे कोण आहे हे पाहून नष्ट केले पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले. मुंबई पोलिसांना माझी विनंती आहे, तुमच नाव खराब होत आहे. हे सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे, कोणत्याही दबावाला बळी न पडता यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले.