Baba Siddique ( Marathi News ) : काल माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यांच्या हत्येनंतर आता राष्ट्रवादीतील अजित पवार गटातील नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे, आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याला फटकारलं आहे.
"एका आठवड्यात राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांच्या हत्या झाल्या. बाबा सिद्दिकी मोठे नेते होते.पंधरा दिवसापूर्वी त्यांना धमकी आली होती. यानंतर त्यांनी संरक्षणाची मागणी केली होती. मात्र त्यांना सुरक्षा व्यवस्था न पुरवल्याने त्यांची हत्या झाली. आज तीन आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने हे भयंकर आहे. तितकच मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे भयंकर आहे. सामान्य व्यक्तीबाबत असं घडलं तर आपण समजू शकतो पण, माजी मंत्री राहिलेल्या व्यक्तीची हत्या होणं म्हणजे गृहखात्याचं हे फेल्युअर आहे का? असा प्रश्न व्हायला वाव मिळतो, असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.
"या घटनेल मुंबई पोलिसच जबाबदार आहेत. मुंबई पोलिसांनी गांभीर्याने घेतले असते तर ही घटना झाली नसती. मात्र आज झालेली घटना राष्ट्रवादीसाठी मोठी घटना आहे. अजितदादांच्या विश्वासातील मित्र पक्षाने आज गमावला आहे. पोलिसांनी आता बिश्नोई गँगच्या दिशेने तपास सुरू केला आहे. बाबा सिद्दीकी सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या परिवाराचे एक घटक होते. सलमान खान यांनाही तशी धमकी आली होती, त्या पद्धतीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे, असंही मिटकरी म्हणाले.
राहुल गांधी यांनी केली पोस्ट
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "बाबा सिद्दीकीजी यांचं निधन धक्कादायक आणि दुःखदायक आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. या भीषण घटनेने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचं दिसून येत आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.