अजित पवारांना झटका, बड्या नेत्यानं सोडली साथ; शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 10:11 AM2024-07-27T10:11:26+5:302024-07-27T10:13:00+5:30

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्याने शरद पवारांची भेट घेत त्यांच्यासोबत भविष्यात काम करणार असल्याचा निर्धार केला. 

Babajani Durrani, the leader of Ajit Pawar group, joined the Sharad Pawar-led NCP | अजित पवारांना झटका, बड्या नेत्यानं सोडली साथ; शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी

अजित पवारांना झटका, बड्या नेत्यानं सोडली साथ; शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी

छत्रपती संभाजीनगर - अजित पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे पक्षात अस्वस्थ असल्याचं चित्र आहे. नुकतेच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते राष्ट्रवादी शरद पवार गटात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीच्या सेक्युलर विचारसरणीचा ताळमेळ शिवसेना शिंदे गट आणि भाजपा पक्षाशी बसत नाही. जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी एकमत होत नाही असं विधान बाबाजानी दुर्राणी यांनी केले आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथे बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर ते म्हणाले की, मी साहेबांची भेट घेतली. मी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली भविष्यात काम करणार आहे. १९८५ पासून मी शरद पवारांसोबत काम करतोय. एस काँग्रेसपासून मी काम केले आहे. मध्यंतरी वेगळी वाट निवडली होती. समविचारी पक्षांसोबत काम करणं योग्य आहे. कार्यकर्ते, मतदारांमध्ये मतभेद निर्माण होतात तिथे काम करणं कार्यकर्ते आणि नेत्यालाही अवघड होतं अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. 

तसेच भाजपा, शिवसेना यांच्यासोबत काम करणे कार्यकर्ते आणि आमच्या मतदारांनाही अवघड जातंय. काही निर्णय होतात, निवडणुकीचे निकाल बघून आलो नाही. मी ग्राऊंडवरचा कार्यकर्ता आहे. नेहमी धर्मनिरपेक्ष विचाराने काम करत आलो. अजित पवार काम करतायेत, फुले-शाहू-आंबेडकरी विचाराने काम करतायेत. परंतु त्यांच्यासोबत दोन पक्ष असल्याने अल्पसंख्याक विचारांच्या कार्यकर्त्यांसाठी काम करणे अवघड होतेय असंही माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले. 

दरम्यान, कुठल्याही प्रकारचे आश्वासन नाही, विचारसरणीच्या आधारे मी पुन्हा प्रवेश केला आहे. धर्मनिरपेक्ष विचाराने एकत्र येत जे पक्ष राजकारण करतायेत. देशात मुस्लीम समाजाची कुंचबणा होतेय. जे भाजपासोबत आहेत अशांनाही मतदान करायला मतदार तयार नाहीत. त्यामुळे अशा पक्षांसोबत राहणे, काम करणे शक्य नाही त्यामुळे मी शरद पवारांच्या नेतृत्वात काम करतोय असं बाबाजानी दुर्राणी यांनी म्हटलं.

कोण आहेत बाबाजानी दुर्राणी?

बाबाजानी दुर्राणी हे परभणीचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. ते विधान परिषदेचे आमदार होते. मागील महिन्यात त्यांची आमदाकी टर्म संपली. दुर्राणी यांनी पुन्हा विधान परिषदेचे तिकीट मागितले होते. परंतु अजित पवारांकडून त्यांना संधी मिळाली नाही. बाबाजानी दुर्राणी हे २००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर आमदार होते. त्यानंतर २०१२-२०१८ मध्ये शरद पवारांनी दोनदा त्यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. मात्र यंदा अजित पवारांनी त्यांच्याऐवजी परभणीतील राजेश विटेकर यांना विधान परिषदेवर निवडून आणलं. त्यामुळे दुर्राणी नाराज असल्याची चर्चा होती. 
 

Web Title: Babajani Durrani, the leader of Ajit Pawar group, joined the Sharad Pawar-led NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.