मुंबई : राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळेच राष्ट्रीय नेत्यांबाबत ते बेताल वक्तव्ये करीत आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या खासगी आयुष्यावर टिप्पणी करण्याऐवजी त्यांनी तातडीने मानसिक उपचार घ्यावेत, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली.राहुल गांधी यांच्या खासगी आयुष्याबाबत हीन पातळीवर येऊन बेताल वक्तव्य करणा-या लोणीकरांचा तीव्र निषेध करून, अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून मिरविणा-या लोणीकरांनी विरोधकांच्या सभा उधळून लावा, त्यांचे पुतळे जाळा, त्याच्या बातम्या पेपरमध्ये छापून आणा, अशी चिथावणीखोर आणि हिंसक भाषा वापरली आहे. त्यांच्या वक्तव्यातून भाजपाच्या सुसंस्कृतपणाचा बुरखा फाटला आहे, असे चव्हाण म्हणाले.सरकारच्या चुकीच्या धोरणांवर, निर्णयांवर टीका करणे हे विरोधकांचे काम आहे. विरोधी पक्षांना संविधानाने हा अधिकार दिला आहे, परंतु भाजपाला संविधानही मान्य नाही आणि लोकशाहीवरही विश्वास नाही. त्यांना हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करायचा आहे. त्यामुळेच विरोधकांना मारहाण करा, तोडफोड करा, त्यांच्या सभा उधळून लावा, अशा पद्धतीच्या धमक्या भाजपाचे मंत्री देत आहेत. भाजपावाल्यांच्या या धमक्यांना काँग्रेस भीक घालत नाही. भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आणि कामावर प्रहार करण्याचे काम आम्ही यापुढेही जारी ठेवू. यापूर्वीही भाजपा नेत्यांनी शेतकरी आणि विरोधी पक्षांबाबत बेताल वक्तव्ये केली आहेत. सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपा नेते अशी बडबड करीत आहेत. त्यांची ही सत्तेची नशा उतरविल्याशिवाय जनता शांत राहणार नाही, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
बबनराव लोणीकरांना उपचारांची गरज - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 4:14 AM