मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तासंघर्ष पाहायला मिळत असताना दुसरीकडे भाजप-शिवसेनेकडून निवडणून आलेल्या आमदारांकडून मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले बबनराव लोणीकर यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे याबाबत खुद्द लोणीकरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी ही माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आलेल्या आकड्यांनंतर मुख्यमंत्रीपदावरू भाजप-शिवसेनेत सत्तासंघर्ष सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र असे असले तरीही पक्षाच्या मोठ्या नेत्यांमध्ये बैठक होऊन तडजोड करून पुन्हा युतीची सरकार येणार असल्याचा दावा सुद्धा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
त्यामुळे या दोन्ही पक्षातील निवडून आलेल्या अनेक आमदारांना मंत्रीपदाची अपेक्षा लगली आहे. गेल्यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदाची जवाबदारी पार पाडणारे परतूर मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांचे नाव सुद्धा आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. युतीचे पुन्हा मंत्रिमंडळ स्थापन होणार असून, मुख्यमंत्री मला निश्चितच मंत्रीपदाची जवाबदारी माझ्याकडे देतील. त्यांनी दिलेली जवाबदारी मी चांगल्याप्रकारे पार पाडेल असे लोणीकर म्हणाले आहे.
परतूर येथे मंगळवारी लोणीकरांनी आयोजित केलेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाला मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे ओमप्रकाश शेटे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सुद्धा आपल्या भाषणादरम्यान लोणीकरांचा समावेश मंत्रिमंडळात होणारच असे सूतोवाच त्यांनी केला.