मुंबई : आपल्या बाळाचा मृत्यू हा डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे झाला, असा गैरसमज झाल्यामुळे शेख कुटुंबीयांनी रविवारी संध्याकाळी ५ वाजता वांद्रे येथील भाभा रुग्णालयात गोंधळ घातला. मात्र, बाळ नऊ महिन्यांआधी जन्माला आले होते आणि वजन कमी असल्यामुळे दगावल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना समजावल्यावर रुग्णालयातील वातावरण निवळले. वांद्रे येथील भाभा रुग्णालयामध्ये रविवारी सायंकाळी ५ वाजता शेख कुटुंबीयांनी गोंधळ सुरू केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. वांद्रे येथे राहणाऱ्या रेश्मा सरफराज शेख या महिलेने २४ जुलै रोजी एका मुलाला भाभा रुग्णालयामध्ये जन्म दिला होता. नऊ महिने पूर्ण होण्याआधीच जन्माला आलेल्या या बाळाचे वजन सव्वा किलो इतके कमी होते. यामुळे या बाळाची विशेष काळजी घेतली होती. १ महिना बाळावर रुग्णालयामध्येच उपचार सुरू होते. २४ आॅगस्ट रोजी या बाळाला डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बाळाला गॅस्ट्रोचा त्रास सुरू झाल्यामुळे २६ आॅगस्ट रोजी परत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तत्काळ उपचार सुरू झाल्यामुळे बाळाची प्रकृती स्थिरावली होती. मात्र रविवारी सकाळी बाळाची प्रकृती बिघडली आणि दुपारी ४ वाजता बाळ दगावले, अशी माहिती भाभा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली. बाळाच्या प्रकृतीची कल्पना आम्ही आधीच नातेवाइकांना दिली होती. बाळाचा मृत्यू हा नैसर्गिक आहे. मात्र, बाळाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यामुळे कुटुंबीय हादरले. मृत्यूनंतर एक तासाने कुटुंबीय रुग्णालयात घुसले आणि त्यांनी फोन, सीसीटीव्ही फोडायला सुरुवात केली. मात्र जास्त नुकसान झालेले नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा झालेली नाही. आम्ही हल्ला केलेल्या जमावाविरोधात तक्रार दाखल केली आहे, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बाळ दगावल्याने भाभा रुग्णालयात गोंधळ
By admin | Published: September 01, 2014 3:38 AM