मुंबई : इंदूमिलची संपूर्ण साडेबारा एकर जमीन राज्य शासनाच्या नावावर झालेली असून त्यावरील पाडकामही पूर्ण झाले. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी ग्लोबल टेंडरिंगची नोटीसही काढलेली आहे. ग्लोबल टेंडरिंगच्या निकषाप्रमाणे दोन महिन्यात टेंडर फायनल झाल्यानंतर स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल आणि तीन वर्षांत स्मारक उभे राहील, असा विश्वास सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला.मंगळवारी बडोले यांनी इंदूमिलच्या जागेवर जाऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत स्मारकाचे वास्तूविशासद शशी प्रभू, मुंबई महनगर विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, की इंदूमिलची साडेबारा एकर जमीन राज्य सरकारकडे १८ मार्च रोजीच हस्तांतरित झालेली असून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी त्याची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. जमिनीचा प्रत्यक्ष ताबा २५ मार्चला एमएमआरडीएने घेतला आहे. त्यामुळे जमिनीचा ताबा आणि क्षेत्रफळाविषयी जनतेच्या मनात असलेला संभ्रम दूर झाला असल्याचे बडोले म्हणाले.स्मारकाच्या आराखड्यावर अनेक आंबेडकरी अनुयायांनी आक्षेप घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापून सर्वमान्य आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपवली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे मी सर्व आंबेडकरी अनुयायांसोबत अनेक बैठका घेतल्या. सर्वमान्य आराखडा मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द केला. आता तब्बल साडेतीनशे फुटांचा पुतळा उभारला जाईल. (विशेष प्रतिनिधी)
बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तीन वर्षांत - बडोले
By admin | Published: April 27, 2017 1:51 AM