मुंबई : उच्च न्यायालय व इतर न्यायालयांतील न्यायाधीश, न्यामूर्तींची नियुक्ती करताना भ्रष्टाचार होत असल्याचे मत मॅट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गुणरतन सदावर्ते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. अॅड. मोहन पाटील यांनी हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा वाद रंगला. अॅड. गुणरतन सदावर्ते या कार्यक्रमात म्हणाले, न्यायाधीश आणि न्यायामूर्तींच्या निवडीत भ्रष्टाचाराचे आरोप वारंवार होत आहेत. या आरोपांवर तर्कवितर्कही लढवले जातात. मात्र, हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. यापुढे अशा प्रकारचे आरोप होता कामा नयेत, याची काळजी घेण्याची गरज आहे. डॉ. आंबेडकर यांचा १२६वा जयंती उत्सव सोहळा मॅटतर्फे गुरुवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त ‘राष्ट्रीय एकात्मता’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला मॅटचे अध्यक्ष निवृत्त न्या. अंबादास जोशी, आर. व्ही. मलिक आदी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयातील न्या. रणजीत मोरे व न्या. आर. एम. सावंत यांच्या नियुक्तीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यापूर्वी झाला आहे. असे आरोप होऊ नयेत, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे अॅड. सदावर्ते म्हणाले. त्यांचे भाषण थांबवत अॅड. मोहन पाटील म्हणाले की, तुम्ही विशिष्ट समाजाच्या न्यायमूर्तींचा उल्लेख भाषणात केला. त्यांच्या या आक्रमकतेमुळे तणाव निर्माण झाला. मुख्य सरकारी वकील राज पुरोहित, अॅड. अरविंद बांदिवडेकर व इतरांनी मध्यस्ती करत प्रकरण शांत केले. त्यानंतर, न्यायपालिकेत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय खानविलकर, निवृत्त न्या. अंबादास जोशी यांसारखे कर्तव्यदक्ष न्यायामूर्ती असून त्यांनी अनेक महत्त्वाचे निकाल दिले आहेत. अशी न्यायव्यवस्था भ्रष्टाचारमुक्त ठेवणे, सर्वांची जबाबदारी असल्याचे अॅड. सदावर्ते म्हणाले. (प्रतिनिधी)
बाबासाहेबांच्या जयंती कार्यक्रमात रंगला न्यायाधीश नियुक्तीचा वाद
By admin | Published: April 14, 2017 2:22 AM