मुंबई/ लंडन : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पुनित झालेला लंडनस्थित तीन मजली बंगल्याच्या खरेदी व्यवहारावर महाराष्ट्र सरकारने शिक्कामोर्तब केले. या ऐतिहासिक वास्तूचे रुपांतर आंतरराष्ट्रीय स्मारकात केले जाणार आहे. ही वास्तू खरेदीची प्रक्रिया पुढील आठवड्यात पूर्ण केली जाणार आहे.महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि विशेष साह्यमंत्री राजकुमार बडोले यांनी या वास्तूच्या खरेदी व्यवहारांशी संबंधित कराराचे (डीड आॅफ एक्स्चेंज) मालकासोबत अदान-प्रदान केले, असे ब्रिटनमधील फेडरेशन आॅफ आंबेडकराईट अॅण्ड बुद्धिस्ट आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष संतोष दास (लंडन) यांनी सांगितले. या वास्तूचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्रात रुपांतर केले जाईल, असेही दास यांनी सांगितले.सन १९२१ ते १९२२ दरम्यान डॉ. आंबेडकर लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण (डीएससी) घेत असताना लंडनस्थित १०, किंग हेन्री रोड, एनडब्ल्यू-३ स्थित याच वास्तूत राहत होते. ही वास्तू एका इस्टेट एजंटच्या मार्फत विक्रीस काढण्यात आली होती. हे निवासस्थान खरेदी करण्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार दोन दिवसांत रक्कम अदा करील. त्यानंतर ही वास्तू राज्याच्या मालकीची होईल, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विधि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मुंबईत दिली.ही वास्तू खरेदी करण्यासाठी मालकाला अगोदरच ३ कोटी १० लाख रुपये देण्यात आले आहेत. जानेवारीत राज्य सरकारने लंडनस्थित २,०५० चौरस फुट जागेतील हा ऐतिहासिक बंगला ३१ कोटी रुपयांत खरेदी करण्याचा आणि स्मारकात रुपांतर करून ही वास्तू जतन करण्याचा निर्णय घेतला होता.१० टक्के रक्कम मालकाला देण्यात आली महाराष्ट्र सरकारने ही वास्तू खरेदी करण्यासंबंधीच्या दस्तावेजांचे अदान-प्रदान केले आहे. १० टक्के रक्कम मालकाला देण्यात आली आहे. एकदा रजिस्ट्री झाल्यानंतर उर्वरित रक्कमही चुकती केली जाईल. राजकुमार बडोले या ऐतिहासिक क्षणी उपस्थित असतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिष्ट्वट केले आहे.जानेवारीत राज्य सरकारने लंडनस्थित २,०५० चौरस फुट जागेतील हा ऐतिहासिक बंगला ३१ कोटी रुपयांत खरेदी करण्याचा आणि स्मारकात रुपांतर करून ही वास्तू जतन करण्याचा निर्णय घेतला होता.
बाबासाहेबांच्या लंडनमधील घरावर शिक्कामोर्तब!
By admin | Published: August 28, 2015 4:47 AM