प्रदीप यादव - सातारा -ज्ञानरूपी आकाशात आपल्या विलक्षण प्रतिभेचं तेजस्वी वलय निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शालेय जीवनात पहिलं पाऊल टाकलं, ते सातारच्या शाळेत. तो दिवस म्हणजे ७ नोव्हेंबर. ज्ञानरूपी आकाशात भरारी मारण्याचं बळ त्यांना दिलं ते सातारच्याच मातीनं म्हणूनच या मातीला आणि या मातीतून घडलेल्या प्रज्ञावंताला वंदन करण्यासाठी गुरुवारी जिल्हाभर बाबासाहेबांचा ‘शाळा प्रवेश दिन’ मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आपला देश कुठल्या जातिधर्मावर चालत नाही आणि नाही चालत कुठल्या धर्मग्रंथावर तो चालतो तो संविधानावर. असे हे समताधिष्ठित आणि जगातील सर्वांत मोठे संविधान ज्या प्रज्ञावंतानं लिहिलं त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचा पाया घडला तो साताऱ्याच्या मातीत. याचा अभिमान बाळगून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांनी केलेल्या ठरावाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळांमध्ये डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. तसेच संविधानाचे वाचन आणि बाबासाहेबांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासाचा आरंभ साताऱ्यातून झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी येथील राजवाडा सातारा हायस्कूल (सध्याचे छ. प्रतापसिंह महाराज हायस्कूल) मध्ये त्यांनी इयत्ता पहिली इंग्रजी या वर्गात प्रवेश घेतला. हजेरीपुस्तकावर ‘भिवा’ असे त्यांचे नाव होते. चार वर्षे म्हणजे १९०० ते १९०४ या कालावधीत त्यांनी या शाळेत शिक्षण घेतले. याच शाळेत त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत झाला. ज्या मातीनं बाबासाहेबांना घडविलं, ज्या मातीत प्रज्ञावंताच्या पावलांचे ठसे उमटले त्या मातीला वंदन करण्यासाठी दरवर्षी शाळा प्रवेशदिनी असंख्य लोक सातारच्या प्रतापसिंह महाराज हायस्कूलला भेट देतात. बाबासाहेबांचे शाळेत पाऊल पडलेच नसते तर जगाने गौरविलेले संविधान डॉ. आंबेडकरांच्या हातून जन्माला आले नसते. तसे झाले असते तर सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात विषमता निर्माण झाली असती. मानवी मूूल्यांची हत्या झाली असती. वंचितांना आपल्या न्याय, हक्काची जाणीव कधीच झाली नसती. माणसाला माणूस म्हणून जगता आले नसते. म्हणूनच बाबासाहेबांचा शाळा प्रवेश हा युगांतराची चाहूल देणारी व इतिहासाला कूस बदलावयास लावणारी अशी क्रांतिकारी घटना आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक अरुण जावळे यांनी दिली. बाबासाहेबांची पहिली स्वाक्षरी शाळेच्या रजिस्टरला १९१४ या क्रमांकासमोर बाबासाहेबांची स्वाक्षरी आहे. इंग्रजीमध्ये केलेली ती स्वाक्षरी एखाद्या उच्चशिक्षिताला लाजवेल अशीच आहे. हा ऐतिहासिक दस्तावेज आहे. म्हणूनच आजही शाळा प्रशासनाने तो जपून ठेवला आहे. फी भरून घेतला होता प्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत मागास असलेल्या समाजघटकांना आरक्षण दिले. सर्वच बाबतीत पिछाडीवर असलेला समाज मुख्य प्रवाहात यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. ज्यांनी इतरांच्या परिस्थितीचा विचार केला त्या बाबासाहेबांनी स्वत: मात्र पैसे भरूनच शाळेत प्रवेश घेतला होता. दहा वर्षांच्या प्रयत्नांना मिळाले यश भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या शैक्षणिक प्रवासाचा आरंभ साताऱ्याच्या मातीतून झाला, हे आपणा सर्वांचे अहोभाग्य आहे. अशा या महामानवाचा शाळा प्रवेश दिन जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत साजरा व्हावा आणि यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, या हेतून अरुण जावळे हे दहा वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असून जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये हा सोहळा साजरा होत आहे.
बाबासाहेबांचा ‘शाळा प्रवेश दिन’ जिल्हाभर!
By admin | Published: November 06, 2014 10:13 PM