मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तसेच नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणे टाळावे. भाजप आणि शिवसेनेचे वाचाळवीर ज्या पद्धतीने बोलतात, तसं चुकूनही बोलू नका, बोलता येत नसेल तर शांत रहा, अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिली. बारामती मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी धरणातील पाण्यावरून केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेनंतर अजित पवार कमालीचे सावध झाल्याचे चित्र आहे. पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तोलून मापून बोलावे. बोलता येत नसेल तर शांत रहावे. एक वाक्य चुकलं तर सोशल मीडियावर ते गाजतं, त्यामुळे काळजी घ्या असंही अजित पवार यांनी म्हटले.
नागपूरच्या सभेत मित्र पक्षाच्या नेत्याने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याबद्दल मी माफी मागतो. हे मला अजिबात आवडले नाही. आपल्या नेत्यांना देखील हे आवडणार नाही. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना बगल देणारी ही बाब असल्याचं अजित पवार म्हणाले.
यावेळी अजित पवार यांनी भाजपवर कडाडून टीका केली. मागील पाच वर्षांत केवळ दोन लोकांनी सरकार चालवले. खुद्द नितीन गडकरी सांगतात, सरकारमध्ये माझं कोणीच ऐकत नाही. भाजपमधून ज्येष्ठांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. हे पाहून सुषमा स्वराज खुद्द म्हणाल्या मला लढायचचं नाही. उमा भारतींना डावलले, शत्रुघ्न सिन्हांनी पक्ष सोडला, हे सर्व का झालं याचा विचार करा, असंही अजित पवार यांनी म्हटले.