पणजी : पक्षविरोधी कारवाया व तशा प्रकारची वक्तव्ये याची दखल घेऊन आमदार बाबूश मोन्सेरात आणि माविन गुदिन्हो या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यावर आता दिल्लीतही शिक्कामोर्तब झाले आहे, अशी माहिती मिळाली. या हकालपट्टीनंतर विधानसभेत काँग्रेसचे केवळ सातच आमदार शिल्लक राहणार असल्याने काँग्रेसला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मिळालेली मान्यताही त्यामुळे जाऊ शकते याची कल्पना पक्षाला आली आहे. मोन्सेरात व गुदिन्हो यांनी आतापर्यंत पक्षाविरुद्ध खूपच वक्तव्ये करून प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनाही आव्हान दिले आहे. पणजीच्या पोटनिवडणुकीवेळीही मोन्सेरात यांनी फालेरो यांना आव्हान दिल्याने स्वत: फालेरो यांनी मोन्सेरात यांना घरचा रस्ता दाखवायलाच हवा, अशी भूमिका घेतली. मोन्सेरात यांना पक्षातून काढले नाही तर आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देईन, असेही फालेरो यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. मोन्सेरात व गुदिन्हो या दोघांचीही हकालपट्टी करावी, असे फालेरो यांनी दिल्लीस काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना कळविले आहे. त्या नेत्यांनीही यास मान्यता दिली आहे, अशी माहिती मिळाली. फालेरो सोमवारी सायंकाळी दिल्लीस रवाना झाले आहेत. काँग्रेसमध्ये राहिले तरी, मोन्सेरात व गुदिन्हो हे स्वस्थ बसणार नाहीत. त्यामुळे त्यांची हकालपट्टी व्हायलाच हवी, अशी स्पष्ट भूमिका प्रदेश काँग्रेसने घेतली आहे. चाळीस सदस्यीय विधानसभेत एखाद्या पक्षास प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी ठराविक आमदार संख्या असणे गरजेचे असते. काँग्रेसच्या आमदारांची संख्या दोनने कमी झाल्यानंतर पक्षाचे विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येऊ शकते. प्रमुख विरोधी पक्ष ही मान्यता अडचणीत येऊ शकते याची कल्पना माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप व इतरांनी फालेरो यांना दिली आहे. अर्थात काहीही झाले तरी, आता काँग्रेसने मागे हटायचे नाही, असे ठरवले आहे. मोन्सेरात व गुदिन्हो यांनी आतापर्यंत काँग्रेसचे खूप नुकसान केल्याने त्यांची हकालपट्टी झाल्यास काँग्रेसजनांमध्ये योग्य संदेश जाईल व पक्षाच्या प्रतिमेसाठी ते उपयुक्त ठरेल, असे काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक चेल्लाकुमार यांचेही मत बनले असल्याचे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)
बाबूश, माविन यांची हकालपट्टी निश्चित
By admin | Published: February 24, 2015 3:03 AM