वर्धा - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले, महाराष्ट्रासाठी हा मार्ग प्रगतीचा ठरेल असा विश्वास सगळ्यांनीच व्यक्त केला. मात्र याच मार्गावर होणाऱ्या अपघातांनी अनेकांची चिंता वाढवली आहे. केवळ माणसेच नव्हे तर समृद्धी महामार्गावरील अपघातात मुक्या प्राण्यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच एक घटना २ महिन्यापूर्वी समृद्धी महामार्गावर घडली.
समृद्धी महामार्गावर वर्धानजीक एका मादी माकडाचा अपघातात मृत्यू झाला होता. यावेळी माकडासोबत त्याचे पिल्लूही होते. आईच्या अपघातानंतर पिल्लू आईला पकडूनच होते. तेव्हा महामार्गावरून जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेने अपघात झालेल्या माकडाला आणि त्याच्या पिल्लाला वर्ध्यातील करूणाश्रम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले होते.
याबाबत प्राणीमित्र ऋषिकेश गोडसे म्हणाले की, जेव्हा करुणाश्रममध्ये या माकडाला आणि पिल्लाला आणले. तेव्हा या पिल्लाला जगवायचे कसे हा प्रश्न पडला होता. मग आम्ही या पिल्ल्ला टेडीबिअर दिला. त्या टेडीबिअरच्या सहाय्याने हे पिल्लू आता २ महिन्याचे झाले आहे. या पिल्लाचे आणि टेडी बिअरचे अनोखं नाते बनले आहे. पिल्लाला दूध दिल्यानंतर हा टेडीबिअरजवळ जाऊन त्याला स्वत:ची आई समजून फिडिंग करतो. आता या पिल्ल्याची प्रकृती सदृढ आहे असं त्यांनी सांगितले. तसेच माकडाच्या पिल्ल्लाला माणसाने हाताळले नाही कारण ते माणसाळू नये. जर या पिल्लाला माणसाची सवय लागली तर त्याला जंगलातील अधिवासात मुक्तपणे संचार करता येणार नाही याची खबरदारीही प्राणीमित्रांनी घेतली.