मुंबई : ड्रगमाफिया शशिकला ऊर्फ बेबी पाटणकरला आज विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. ही घडामोड गुन्हे शाखेला चपराक असून, हे संपूर्ण प्रकरणच गुन्हे शाखेवर शेकण्याचे संकेत देणारी आहे. विशेष न्यायाधीश यू. बी. हजीब यांच्यासमोर बेबीच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. बेबीच्यावतीने अॅड. एन. एन. गवाणकर यांनी बाजू मांडली. एप्रिल महिन्यात बेबीला गुन्हे शाखेने अटक केली, तेव्हा तिच्याकडे कोणत्याही प्रकारचा अमली पदार्थ सापडला नव्हता. या प्रकरणातील मुख्य आरोपी धर्मराज काळोखे व बेबीचा मुलगा सतीश यांच्या जबाबावरून गुन्हे शाखेने ही अटक केली. २०१४मध्ये एमडी वितरक सॅम्युअलकडून काळोखे व सतीश यांनी पुण्याजवळ एमडीचा मोठा साठा घेतला. तो या दोघांनी लोणावळ्याच्या बंगल्यात ठेवला. पुढे काळोखेने तो साठा नेला. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत बेबीचा सहभाग कुठेच आढळलेला नाही किंवा तो सिद्ध करणारे पुरावे गुन्हे शाखेने सादर केलेले नाहीत, असा युक्तिवाद केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे २०१४मध्ये एमडी हा विशेष कायद्यानुसार अमली पदार्थांच्या सूचीत समाविष्ट नव्हता. ५ फेब्रुवारी २०१५पासून एमडी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यात समाविष्ट झाला. मात्र त्याचा परिणाम आधीच्या गुन्ह्यांमध्ये होऊ शकत नाही. तसेच मुंबईच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने काळोखेकडून सापडलेला पदार्थ एमडी नसून, अजिनोमोटो असल्याचा अहवाल दिला़ हे मुद्दे अॅड. गवाणकर यांनी न्या. हजीब यांच्यासमोर मांडले. ते ग्राह्य धरीत हजीब यांनी बेबीला पाच लाख रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला.मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेमुणकीस असलेला बडतर्फ शिपाई काळोखे याला सातारा पोलिसांनी ११० किलो तथाकथित एमडीसह अटक केली. पोलीस ठाण्यातील कपाटातून १२ किलो एमडी सापडले. हा साठा बेबीचा असल्याचे काळोखेने जबाबात सांगितले. त्यानुसार बेबीविरोधात सातारा व मरिन ड्राइव्ह पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा नोंदविला. याव्यतिरिक्त वसईतही बेबीविरोधात गुन्हा दाखल आहे. यापैकी मरिन ड्राइव्हचा गुन्हा गुन्हे शाखेकडून तपासला जात आहे. पासपोर्ट जमाजामीन दिल्यास बेबी परदेशात परागंदा होऊ शकेल, असा दावा गुन्हे शाखेने केला होता. मात्र गेल्या आठवड्यातच बेबीचा पासपोर्ट न्यायालयात जमा केल्याचे अॅड. गवाणकर यांनी न्यायालयास सांगितले.रिसॅम्पलिंगवरही प्रश्नचिन्हमुंबई व सातारा पोलिसांनी हस्तगत केलेला पदार्थ एमडी नसून अजिनोमोटो आहे, असा निर्वाळा स्थानिक न्यायवैद्यक प्रयोगशाळांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने या पदार्थाची हैदराबादेतील केंद्रीय प्रयोगशाळेकडून पुन्हा चाचणी करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. मुळात पहिल्या चाचणीचा अहवाल मिळाल्यानंतर पुढल्या १५ दिवसांत तसा अर्ज करणे अपेक्षित असताना गुन्हे शाखेने हा अर्ज १२ दिवस विलंबाने केल्याची माहिती मिळते. २२ जुलैला न्या. हजीब यांच्यासमोर गुन्हे शाखेच्या या अर्जावर सुनावणी होईल.
बेबी पाटणकरला जामीन
By admin | Published: July 16, 2015 12:08 AM