Winter Session Maharashtra 2023: माझ्यावर टीका केली तर ठीक आहे. पण ज्या दिवशी तुम्ही जातीवर बोलायला लागाल. मराठ्यांनी असे केले, मराठ्यांनी तसे केले, मराठा समाज जणू अन्याय करणारी जमात झाली असल्याचे चित्र उभे करण्यात येत आहे. राजकारण होत राहील. तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मात्र विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका. अमृत पाजून मुख्यमंत्री व्हा, आणि असे होता येते. घरे जाळण्यात आली याचा निषेध केलाच पाहिजे. घर जाळण्यापर्यंत हात जात असतील तर त्यांची हात पाय तोडून टाका, या शब्दांत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी हल्लाबोल केला.
ज्याचे आमदार जास्त त्यांना कमी आरक्षण द्याल असे म्हणत असाल तर २०० आमदार असलेल्यांना आरक्षण द्यायच नाही का?, असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते. त्यामुळे पुरावे शोधले गेले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले. हेदेखील यांना मान्य नाही. मराठा समाजात किती आमदार आणि खासदार आहेत यावरून ते मागास नाही असे कसे म्हणता येईल? अशी विचारणाही बच्चू कडू यांनी केली.
हे सर्व थांबवायचे असेल तर प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केले पाहिजे
जातीपाती मी मानत नाही, जात लागली की मरेपर्यंत जात नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी शरीरात जात घुसू दिली नाही. पण आपण पुतळ्याला जात लावतो. हिंदू खतरे में है म्हणतात, पण कोणीच खतरे में नहीं है. नेता खतरे में है. त्यामुळे, हे सर्व थांबवायचं असल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केले पाहिजे. दलित मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काही सभा बघितल्या, त्यात १६० आमदार पाडू असे म्हणाले. काय भाषा आहे. विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका. मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्या किती वाईट आहे. ५० आत्महत्या झाल्या, यावर कोणी बोलत नाही. एवढे आपण जातीवादी झालो. एखाद्या आंदोलनात लाठीचार्ज करता, त्याची चौकशी झाली पाहिजे. तुमच्या बाजूला गृहमंत्री बसतात आणि आग कशी लावली म्हणता. बाजूला अर्थमंत्री बसतात आणि म्हणता ओबीसीला काही दिले नाही. ही भाषा मंत्रिमंडळ बैठकीत केली पाहिजे. अशी भाषा जनमानसातील नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.