Bacchu Kadu: सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमची जाहिरात करत असल्याबाबत प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला होता. सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीने ऑनलाइन गेमिंगची जाहिरात करणे योग्य नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली. मात्र, यातच आता ही जाहिरात केल्याबद्दल सचिन तेंडुलकर यांना नोटीस बजावण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी थेट राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे.
सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमची जाहिरात केली आहे. या प्रकरणी सचिन तेंडुलकर यांना राज्य सरकारने नोटीस पाठवून जाब विचारला पाहिजे. सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. भारतरत्न असलेल्या व्यक्तीने ऑनलाईन गेमला प्रोत्साहन देणे योग्य नाही. हे चुकीचे आहे. तसेच राज्य सरकारने ऑनलाइन गेमवर बंदी घालावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांना सुनावले
बच्चू कडू यांनी यावेळी आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावरही टीका केली. सभागृहात बोलत होतो. तेव्हा आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव हे चहाच्या टपरीवर बोलत असल्यासारखे बोलत होते. त्यांना बोलायचे होते तर त्यांनी बाहेर जाऊन बोलायला हवे होते. म्हणूनच मी हा जुगाराचा अड्डा नाही, असे म्हटले होते, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. तसेच आमच्या सरकारला खोके सरकार म्हणण्याचा उद्धव ठाकरे यांना अधिकार नाही. त्यांनी मुंबई महानगरपालिकेत काय केले? इतकी वर्षे तिथे त्यांची सत्ता होती ना? अशी विचारणा करत, सरकारच्या कामाला जनतेतून पसंती मिळत आहे. म्हणून अजितदादा गटाकडे अजून आमदार येतील, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्य सरकारने आता मंत्रिमंडळ विस्तार करून फायदा नाही. थोड्याच दिवसात आचारसंहिता लागणार आहे. पाच सात महिन्यांसाठी मंत्रिमंडळ विस्तार करून फायदा नाही. विस्ताराच्या दिवशी मी परदेशात निघून जाईन, असे बच्चू कडू यांनी सांगितले.