मुंबई : राजकारणात दबंग आमदार म्हणून ओळख असलेल्या बच्चू कडू यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात केली आहे. मंत्रिपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर बच्चू कडू यांनी बुधवारी दर्यापूर तहसील कार्यालयाला भेट दिली आणि पहिल्याच दिवशी दोन नायब तहसीलदारांवर थेट निलंबनाची कारवाई केली.
आज राज्यमंत्री बच्चू कडू अमरावतीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी दर्यापूर येथील तहसील कार्यलयाला भेट दिली आणि तक्रारीसंदर्भात बैठक घेतली. यावेळी संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा आणि अनेक नागरिकांना रेशन कार्ड न दिल्याने संबंधीत दोन नायब तहसीलदारांवर बच्चू कडू यांनी कारवाई केली. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्यामुळे निरीक्षक सपना भोवते आणि नागरिकांना रेशन कार्ड न दिल्याने नायब तहसीलदार (पुरवठा)प्रमोद काळे यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मी प्रवासात अचनाक दर्यापूर येथील तहशिलदार कार्यालयात जाऊन भेट दिली. त्यावेळी पवार नावाच्या पारधी समाजाच्या शेतकऱ्यांनी येऊन माझ्याकडे तक्रार केली. ते मागील एक वर्षांपासून अंत्योदय कार्ड मिळावे म्हणून प्रयत्न करत होते. मात्र, तरिही त्यांना ते कार्ड मिळाले नाही. त्यानंतर मी तहसिलदार यांच्याकडे जाऊन त्यांची फाईल पाहिली. तेव्हा या फाईलवर 1 वर्षांपासून काहीही कारवाई झाली नसल्याचे दिसून आले, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
तसेच, सेवा हमी कायद्यानुसार 7 दिवसांहून अधिक काळ कोणतीही फाईल ठेवता येत नाही. अशी फाईल कोणतीही कारवाई न करत ठेवल्यास संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी लागते. म्हणून संबंधित अधिकाऱ्यांवर 1 वर्षांपासून फाईलवर कारवाई न केल्याने निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
दरम्यान, अचलपूर मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेले बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि निराश्रितांना न्याय, हक्कांसाठी राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात लढत दिली. प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी यंदा विजयाचा चौकार मारला. बच्चू कडू हे निवडून आल्यापासून शिवसेनेसोबत आहेत. बच्चू कडू यांना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे.