Maratha Reservation:मराठा आरक्षणासाठीचा लढा गेल्या काही महिन्यांपासून अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. या मुद्द्यावरून अद्यापही दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. २४ डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले असले तरी सरकार मात्र २ जानेवारीपर्यंत मुदत दिल्याचे सांगत आहे. या तारखांवरून काहीशी संभ्रमावस्था असल्याचे पाहायला मिळत असून, यावरून आता वाद निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.
यातच बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना, मनोज जरांगे पाटील सरकारला मुदत वाढवून देऊ शकतात, असे म्हटले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने १५ दिवसांचा प्रगती अहवाल दाखवावा. मग मनोज जरांगे यांच्यासोबत बैठक घ्यावी. काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे, असं मनोज जरांगे यांना वाटले, तरच ते वेळ वाढवून देतील, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी आईची इच्छा आहे. तर...
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा मातोश्रींनी बोलून दाखवली. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यासंदर्भात बच्चू कडू यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी आईची इच्छा आहे. तर नक्की होतील, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
दरम्यान, तारखेच्या घोळ दूर करण्यासाठी शनिवारी शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची रूग्णालयात भेट घेतली. तारखेच्या विषयात २४ डिसेंबर आणि २ जानेवारी यात फरक नाही. पाच-सहा दिवसांचा फरक आहे. त्याने काही फरक पडणार नाही. त्याच्या आतही सरकारचे काम होऊ शकते, असे संदीपान भुमरे यांनी म्हटले आहे.