Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका करत आहेत. शिंदे गटाचे नेते आणि भाजप याला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. यातच संजय राऊतांनी २ हजार कोटींच्या केलेल्या दाव्यावर आता प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नाव मिळवण्यासाठी २ हजार कोटीचा व्यवहार झाला. त्याचे पुरावे लवकरच येतील. खात्रीने सांगतो ही डील झाली. हा सौदा आहे. जो पक्ष नगरसेवक आणि शाखाप्रमुखांना विकत घेण्यासाठी ५० लाख देतोय, आमदारांना विकत घेण्यासाठी ५० कोटी आणि खासदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी देतात तो पक्ष शिवसेना हे नाव घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल याचा हिशोब लागणार नाही. हा न्याय नाही. हे डील आहे. राजकीय पक्ष फोडण्यासाठी भाजपने दुसऱ्या पक्षातील आणि अपक्ष आमदारांना एजंट म्हणून नियुक्त केले, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. याला बच्चू कडूंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊतांच्या मेंदूचा केमिकल लोचा
संजय राऊत यांनी एक तरी एजंटचे नाव सांगावे. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहे. सध्या त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांच्या मेंदूचा केमिकल लोचा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यवस्थित अभ्यास करून न्यायालयात बाजू मांडली आहे. त्यामुळे राऊत यांनी प्रथम अभ्यास करावा आणि त्यानंतर बोलावे, या शब्दांत बच्चू कडू यांनी संजय राऊतांवर टीका केली.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊतांच्या विधानाचा समाचार घेतला. राजकारणात माणूस कधी वर जातो, कधी खाली जातो. मात्र इतके निराश होऊन मनात येईल ते बोलल्यामुळे लोक त्यांच्या बुद्धीची कीव करतात. त्यांच्या बोलण्याने काही होत नाही. मात्र लोकांना वाटते की, आपण ज्यांना मोठे नेते म्हटले तेच नेते संजय राऊतांसारखे निर्बुद्धपणे बोलतात. त्यामुळे अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"