Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर ठाकरे गट अधिक आक्रमक झाला असून, शिंदे गट आणि त्यांना पाठिंबा दिलेल्या बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर टीका होताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलेल्या टीकेला प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ठाकरे गटाची शिवगर्जना यात्रा सुरू आहे. शिवसेना नेते विविध मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी, देवेंद्र फडणवीस नवनीत राणांच्या हाताने बच्चू कडूंचा गेम करत आहेत, अशी टीका केली होती. या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेत बच्चू कडू यांनी सुषमा अंधारेंना चांगलेच सुनावले आहे.
विकासासाठी गुवाहाटीला गेलो
आमचे नाव प्रहार आहे. आम्ही वार करतो. आम्ही फसत नाही. आम्ही विकासासाठी गुवाहाटीला गेलो. देवेंद्रजी आम्हाला मदतच करणार आहेत. केवळ एक फोन केला म्हणून कुणी गुवाहाटीला जात नाही. आम्ही नुकतेच १५० कोटींचा निधी मिळवला. यामध्ये रस्ते विकासासाठी कालच १२७ कोटी रुपये मंजूर केले. अचलपूरच्या इतिहासात पहिल्यांदा एवढी मोठी रक्कम आली आहे. चार प्रकल्प मंजूर केले आहेत. मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
आमची पंधरा वर्षे अशीच गेली
आमची पंधरा वर्षे अशीच गेली. आम्ही सत्तेच्या बाहेर पडून आंदोलने केली. भांडणे केली. त्याकाळात मतदारसंघ थोडा मागे राहिला. राहिला प्रश्न गुवाहाटीला जाण्याचा… तर गुवाहाटीला जायचं की नाही? हे कोण ठरवणार? आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे कुठे जायचे आणि कुठे नाही, हे आम्ही ठरवणार. आम्ही स्वत:च्या अंगावर केसेस घेतल्या. आम्ही लोकांचा मार खाल्ला. त्यामुळे आम्ही कुणाबरोबर बसायचे, हे आता तुम्ही सांगणार का, अशी विचारणा बच्चू कडू यांनी केली.
दरम्यान, शिवसेनेचा आणि आमचा संबंध कुठे आला इथे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आमचा स्वत:चा पक्ष आहे. स्वत:ची मेहनत आहे. आम्हाला कुणी शहाणपण शिकवू नये. आम्ही गद्दारी केली नाही. माझ्या प्रचारासाठी सभा घ्यायला उद्धव ठाकरे आले नव्हते. तरीही तुम्ही आम्हाला गद्दार कसे म्हणू शकता, असा थेट सवाल बच्चू कडूंनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"