Bacchu Kadu News: मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत. त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. याशिवाय शिंदे समिती रद्द करण्याची मागणीही छगन भुजबळ यांनी केली आहे. यावरून राजकीय वर्तुळात अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच आता प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी सूचक विधान केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्रीपदावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील अनेकविध ठिकाणी बॅनर लागल्याचे दिसले. या यादीत आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे नाव जोडले गेले आहे. एकीकडे अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत दावे केले जात असताना, त्यांच्याच गट पक्षातील नेते छगन भुजबळ मुख्यमंत्री बनू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. बच्चू कडू यांनी यासंदर्भात वक्तव्य केले आहे.
छगन भुजबळ अतिशय चांगले अन् दमदार नेतृत्व, भविष्यात मुख्यमंत्री बनू शकतात
मराठा-ओबीसी संघर्षाबाबत बच्चू कडू यांनी सातत्याने स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे. छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून विरोध केला जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, छगन भुजबळांचे नेतृत्व अतिशय चांगले आणि दमदार आहे. फक्त त्यांचा पवित्रा थोडासा चुकला आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे आणि मराठ्यांसह ओबीसींचे, एससी, एसटींचे नेतृत्व करावे. मराठा आणि ओबीसी हे खानदानी शत्रू नाहीत. यासाठी त्यांनी पुढाकार घेतला तर ते दमदार नेतृत्व आहे. अतिशय मजबूत नेतृत्व आहे. त्या पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली तर ते भविष्यात मुख्यमंत्री बनू शकतात, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
दरम्यान, छगन भुजबळ येवला दौऱ्यावर असताना मराठा समुदायाकडून त्यांना प्रचंड विरोध करण्यात आला. मराठा आरक्षण समर्थकांनी भुजबळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. छगन भुजबळांच्या या भूमिकेनंतर मराठा समाजातून त्यांना प्रचंड विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून पाठिंबा मिळत आहे.