Bacchu Kadu vs NCP: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर त्यांच्या पक्षातील, मित्रपक्षातील आणि काही अपक्ष आमदारांच्या साथीने भाजपासोबत सत्तास्थापना केली. शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण त्यात शिंदेंना पहिल्यापासून साथ देणाऱ्या 'प्रहार' संघटनेचे बच्चू कडू यांची वर्णी लागली नाही. याबाबतची नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. पण नंतर, एकनाथ शिंदेंनी दुसऱ्या विस्तारात आपल्याला मंत्री करण्याचा शब्द दिलाय अशी सारवासारवही त्यांनी केली. अशातच दोन दिवसांपूर्वी अपक्ष आमदार रवि राणा यांनी गुवाहाटी म्हणत बच्चू कडूंना डिवचल्यानंतर कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावर आता राष्ट्रवादीकडून बच्चू कडूंना टोला लगावण्यात आला आहे.
महाराष्ट्रात नवीन सरकार बनल्यापासून सत्ताधारी पक्षातील शिंदे गटाच्या आमदारांवर पैसे घेऊन बंडखोरी केल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे. बंडखोर आमदारांना पैसे घेतल्याच्या आरोपावरुन टार्गेट करण्यात येत असताना माजी मंत्री बच्चू कडू यांनी मात्र याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यावरून राष्ट्रवादीचे क्लाईड क्रास्टो यांनी बच्चू कडूंना टोला लगावला. "सुरत, गुवाहाटी आणि गोवा फिरून आल्यानंतरही जेव्हा रिकाम्या हाती एखादा माणूस घरी परततो त्यावेळी त्या माणसावर दु:खाचा 'प्रहार' होणं स्वाभाविकच आहे. बच्चू कडू ज्याप्रमाणे 'कडू' बोलत आहेत, असं वाटतंय की ही म्हण त्यांना लवकरच लागू होणार - 'सुबह का भुला शाम को घर आ जाए, तो उसे भूला नहीं कहते", असे ट्वीट करत राष्ट्रवादीने बच्चू कडूंना टोला लगावला.
बच्चू कडू vs रवी राणा...
'मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैया, पैसा सबका रुपया', असे म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला होता. त्यानंतर राणा यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना बच्चू कडूंची जीभ घसरली. 'अबे हरामखोराची औलाद... आम्ही जर गुवाहटीला गेलो नसतो, तर तू मंत्रिपदाच्या शर्यतीत नसता. तू आता मंत्रिपदाच्या शर्यतीत रांग लावून आहे', असं बच्चू कडू म्हणाले. तसेच, 'आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाही', अशी अतिशय खालच्या पातळीवरील टीका त्यांनी केली होती.