मुंबई: महायुतीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदावरुन दबावाचं राजकारण सुरू असताना शिवसेनेला प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे. प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी प्रहारचे आमदार राजकुमार पटेलदेखील उपस्थित होते. प्रहार जनशक्ती पक्ष संपूर्ण ताकदीनं शिवसेनेच्या सोबत राहणार असल्याची ग्वाही कडू यांनी दिली. त्यामुळे दबावाच्या राजकारणात शिवसेनेचं सामर्थ्य वाढलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी कडूंनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. शेतातील पेरणी ते कापणीपर्यंतची कामं रोजगार हमी योजनेतून करणं, दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची अंमलबजावणी आणि अचलपूर, मेळघाट मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यांवर शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं कडूंनी सांगितलं.
शिवसेनेच्या सामर्थ्यात आणखी वाढ; बच्चू कडूंच्या पाठिंब्यानं भाजपावर 'प्रहार'?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 9:12 AM