नागपूर : लाचखोरीच्या आरोपात अटकेत असलेला देवरी नाक्याचा मोटार वाहन निरीक्षक विकास कावळे कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. त्याच्या छत्रपतीनगर येथील घरातून मिळालेल्या दस्तऐवजावरून ही माहिती उघडकीस आली आहे. एसीबीने कावळे याला आज न्यायालयात सादर करून दोन दिवसाची पोलीस कोठडी घेतली आहे. कावरे याला देवरी नाक्यावर एका ट्रान्सपोर्टरकडून ९ हजार रुपये लाच घेताना पकडण्यात आले आहे. देवरी नाका परिवहन विभागाच्या वसुलीचे केंद्र आहे. एसीबीच्या कारवाईमुळे परिवहन विभाग हादरून गेला आहे. कावळे हा मूळचा नागपूरचा असून ग्रामीण परिवहन विभागात तो कार्यरत आहे. वर्षभरापूर्वीच त्याला या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. यापूर्वी त्याने पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव, अमरावती आदी शहरांमध्ये काम केले होते. एसीबीने पकडल्यानंतर लगेच कावळे याच्या छत्रपतीनगर येथील घराची झडती घेतली. सूत्रांनुसार त्याच्या घरातून वर्धा रोड व मनीषनगर येथे कोट्यवधीचे भूखंड असल्याचे दस्तऐवज सापडले आहेत. याशिवाय चंद्रपूर रोडवर ४० एकर शेती आहे. कावळे याचे शासकीय आणि खासगी बँकेत बचत खाते आहे. त्याचा एक लॉकर सुद्धा एसीबीच्या हाती लागला आहे. या लॉकरमध्ये फारशा किमती वस्तू सापडलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)
लाचखोर कावळे कोट्यधीश
By admin | Published: September 15, 2014 12:58 AM