मुंबईः उद्धव ठाकरे सरकारनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलेलं आहे. ठाकरे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करत असताना विरोधकांनी सभात्याग केला, तर बहुमत चाचणीच्या वेळी मनसे, एमआयएम आणि सीपीआयएमच्या चार आमदारांनी तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहात मनोगत व्यक्त केलं. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्तुतिसुमनं उधळली. उद्धव ठाकरे हे राजकारणातले हरिश्चंद्र माणूस असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.दरम्यान, सगळे नियम, कामकाज धाब्यावर बसवून सभागृहाचं कामकाज सुरू आहे, नियमबाह्य पद्धतीने हे सभागृह सुरू असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदारांनी सभात्याग केला होता. या बहुमताच्या चाचणीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आज विधानसभेत ठाकरे सरकारनं बहुमत सिद्ध केलेलं आहे.शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून यांचं संख्याबळ 170 च्या जवळ होतं, त्यातली 169 मतं महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पडली. आता विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. दरम्यान उद्या (1 डिसेंबर) रविवारीही विधानसभा सुरू राहणार असून, या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
Maharashtra Government: बच्चू कडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 5:38 PM