मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढ काही सुटता सुटत नाही. अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून राजकीय घडामोडींना अधिकच वेग आला आहे. त्यांनतर आमदार फोडाफोडीचे राजकरण होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्ष काळजी घेत आहे. तर निकालानंतर सुद्धा आणि आताही मी शिवसेना सोबतच असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत.
राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थिती पाहता, सर्वच पक्ष आपले आमदार फुटणार नाही याची काळजी घेत आहे. त्यामुळे अपक्ष आमदार यांना आपल्याकडे ओढण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र असे असताना सुद्धा बच्चू कडू यांनी शिवसेनासोबतच राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, मी शिवसेनेसोबतच आहे. याबद्दल कोणतीही शंका नसावी. राजकारणात एकदा घेतलेला निर्णय कोणत्याही मोठ्या कारणांशिवाय बदलला जात नाही. तर महाविकासआघाडी सध्या मजबूत स्थितीत आहे, त्यामुळे ते सरकारस्थापन करु शकतील. असे बच्चू कडू म्हणाले.
तसेच आमच्या पक्षाचे अध्यक्ष मुंबई किंवा दिल्लीत राहात नाही. मी खेड्यातला माणूस आहे. मला केवळ माझा मतदार आदेश देऊ शकतो, असे सुद्धा बच्चू कडू म्हणाले आहे. तसेच शिवसेना सोबतच राहणार असल्याचे ते म्हणाले.