महायुती आणि महाविकास आघाडी यांना निवडणुकीच्या मैदानात टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आज पुण्यात या तिसऱ्या आघाडीसाठी बैठक होणार आहे. या बैठकीला बच्चू कडू येणार होते परंतू ते येऊ शकलेले नाहीत, असे तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
सर्किट हाऊसला दुपारी बैठक होणार आहे. सध्या महाराष्ट्राला अजून एका चांगल्या पर्यायाची गरज आहे. आघाडीच नाव काय असाव? आघाडी कशी असेल यावर चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात काय नाविन्यपूर्ण देता येईल हे बैठकीत ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते आज आलेले आहेत. सध्याच्या सत्ताधाऱ्यांना नागरिक कंटाळले आहेत, असे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, एक सक्षम पर्याय म्हणून तिसरी आघाडी असेल. हा आमचा केवळ प्रयत्न आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सरकार अपयशी ठरली आहे. राज्यात महिला असुरक्षित आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कामगारांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सत्ताधाऱ्यांनी कधीच सोडविले नाहीत, अशी टीका शेट्टी यांनी केली. याचबरोबर महाराष्ट्राचा सातबारा कोणाच्या बापाचा नाही, असेही शेट्टी म्हणाले.
याचबरोबर तिसऱ्या आघाडीत कोणकोण असणार यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला आहे. मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत तिसऱ्या आघाडीच्या सहभागाविषयी सकारात्मक असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.