मुंबई - राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले. यावेळी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे अडवला. तसेच बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर कडू यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वाहनांसमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावर्षी परतीचा पाऊस आणि नंतर अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने राज्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योग्य तो निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपालांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेची दखल घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली होती.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 12:54 PM