नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी सोमवारी प्रहार संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष व आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू यांना पोलिसाला मारहाण करण्याच्या प्रकरणात कायमस्वरूपी अटकपूर्व जामीन मंजूर केला. सुरुवातीला त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन देण्यात आला होता.इंद्रजित चौधरी असे तक्रारकर्त्या पोलिसाचे नाव असून, ते परतवाडा येथील वाहतूक शाखेत कॉन्स्टेबल आहेत. २३ एप्रिल २०१६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्यांनी धीरज निकम याला दंड करून तशी पावती दिली. यानंतर अर्ध्या तासाने बच्चू कडू व त्यांचे कार्यकर्ते चौधरींकडे आले. त्यांनी चौधरींना अश्लील शिवीगाळ व मारहाण केली. परतवाडा पोलिसांनी बच्चू कडू, अंकुश जौंजाळ, मंगेश देशमुख आदींविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, ३३२, २९४, १८६, ३४ अन्वये एफआयआर नोंदविला आहे. सुरुवातीला कडू यांनी अचलपूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. सत्र न्यायालयाने ३० एप्रिल रोजी हा अर्ज फेटाळून लावला. (प्रतिनिधी)
बच्चू कडू यांना जामीन
By admin | Published: June 21, 2016 4:07 AM