महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जोरबैठका सुरु असताना तिकडे तिसरी आघाडीही नावारुपाला येऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बैठकीनंतर उद्या, गुरुवारी पुन्हा महाशक्तीची बैठक घेतली जाणार आहे, याबाबतची माहिती प्रहारचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
यावेळी कडू यांनी महायुतीला चांगलेच फटकारे हाणले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महाशक्ती म्हणून समोरे जाणार आहोत आणि 288 जागांवर लढणार आहोत. उद्या छत्रपती संभाजीनगर येथील बैठक झाल्यानंतर जागा वाटप ठरणार आहे, असे कडू म्हणाले. महायुती विदर्भात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा करत आहे, यावर कडू यांनी त्यांनी लोकसभेतही असाच निर्धार केला होता पण यशस्वी झाले नाहीत हा गुजरात नाही, महाराष्ट्र आह, असा टोला लगावला.
तसेच अजित पवारांच्या अर्थखात्याचा विरोध असतानाही करोडोंचा भूखंड माफक दरात चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आल्यावरूनही कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हेतू चांगला असेल तर कधी कधी नियम बाजूला ठेवावे लागतात. परंतू, अशा कितीतरी जागा काँग्रेस आणि भाजपवाल्यांनी बळकवल्या आहेत, अशी टीका केली.
अक्षय शिंदे एन्काउंटरवरून कडू यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी त्याचा एन्काउंटर कधी झाला याची आपल्याला कल्पना नाही. आम्ही गावाकडे राहतो, टीव्ही पाहत नाही अशी प्रतिक्रिया दिली. तसेच देवा भाऊ न्यायच्या बॅनरबाजीवरून कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पाहिले तर 75 टक्के ठाणेदार बिना पैशाचे काम करत नाहीत, अशी स्थिती आहे. महाराष्ट्र सोडा नागपूर येथील पोलीस पाहिले तर किती लोकांना त्रास देत आहेत, कशी कारवाई होते यावर एखाद्याची पीएचडी होईल असा टोला कडू यांनी लगावला.
सरकारमधील कुठल्याही मंत्र्याचा महाराष्ट्रात वचक नाही. चारित्र्याचा दाखला मिळवण्यासाठी पोलीस 100 रुपये सुध्दा घेतात. जे चांगले पोलीस होते ते बाहेर फेकले गेले जे भ्रष्ट आहेत ते चांगल्या पोस्टवर आहेत, असा आरोप कडू यांनी केला.