Bacchu Kadu on Maharashtra Ministry: महाराष्ट्रात २०२२ मध्ये एक मोठे बंड झाले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि अनेक आमदारांसोबत घेत भाजपाशी हातमिळवणी केली. त्यामुळे राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटाची आणि भाजपाची सत्ता प्रस्थापित झाली. त्यानंतर शिंदे गटाचे ९ आणि भाजपाचे ९ अशा १८ मंत्र्यांचा शपथविधी होऊन त्यांनी विविध खाती मिळाली. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा इतर मंत्र्यांना संधी मिळेल असे सांगितले जात होते. पण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा अजित पवार गटही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. त्यामुळे, 'ज्यांना संपूर्ण भाकरी मिळणार होती, त्यांना आता अर्धी भाकरी मिळेल', अशा प्रकारची प्रतिक्रिया शिंदे गटाकडून दिली जात होती. तशातच प्रहाक संघटनेचे आमदार बच्चू कडूदेखील बरेच दिवसापासून मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले होते. पण आता त्यांनी मंत्रिपदावर सध्या तरी दावा सांगणार नसले तरी सरकारमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
...तर गुवाहटीला जाण्याची वेळ आली नसती!
"2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी मला सहकार्य करायला सांगितले होते. उद्धव यांनी आम्हाला मंत्रिपदाचा शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळला. त्यानंतर मी दिव्यांग मंत्रालयासाठी उद्धव यांच्याकडे शब्द टाकला होता. पण ते त्यांनी केले नाही. ते झालं असतं तर गुवाहटीला जाण्याची वेळ आली नसती. एकनाथ शिंदे यांनी मात्र मुख्यमंत्री झाल्यावर मला दिव्यांग मंत्रालय दिले. त्यामुळे मी अजिबात नाराज नाही," असे कडू म्हणाले.
१८ जुलैला निर्णय घेणार!
"शिंदे-फडणवीस सरकार आले असताना त्यांनी दिव्यांग मंत्रालयाचा विचार केला. त्यामुळे या सरकारमध्ये तीन पक्षांचे नवे समीकरण सुरू झाले असताना आज मी निर्णय घेणार होतो. काल मी 'इतनी शक्ती हमें दे न दाता' ही प्रार्थना ऐकली आणि माझा मंत्रिपदाचा दावा सोडणार होतो, पण मुख्यमंत्री शिंदे यांनी मला सांगितले की दावा सोडू नये. १७ जुलैला मला त्यांनी भेटीची वेळ दिली आहे. त्यानंतर १८ जुलैला मी निर्णय जाहीर करणार आहे," असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
नाराज नाही, उलट खुश आहे!
"मी सध्याच्या राजकीय समीकरणाने नाराज नाही, उलट मी खुश आहे. सध्याच्या सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र आहेत. अशा वेळी मी अजिबात नाराज नाही. सरकार स्थिर आहे याचा मला आनंद आहे. पण आमदार वाढल्याने किती जणांना मंत्रीपदं देणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून मी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी कमी व्हावी या हेतूने मंत्रिपदाचा दावा सोडणार होतो. पण शिंदे, उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांनी मला फोन केले. त्यामुळे मी सध्या कुठलाही निर्णय घेत नसून १७ जुलैला शिंदे यांना भेटणार आहे. त्यानंतर पुढील गोष्टी ठरवेन," असेही कडू यांनी स्पष्ट केले.