नाशिक : मराठा समाजाचा मागासवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विविध संस्थांच्या वतीने साकडे घालण्यात आले. त्याचबरोबर रामगढीया शीख आणि लाडशाखीय वाणी सामजासह इतर समाजांनी आयोगाकडे आरक्षणाच्या मागण्या केल्या आहेत. अल्पसंख्याकांमध्ये पटवेगर यांचा समावेश करण्याची मागणीही करण्यात आली आहे.राज्य मागासवर्ग आयोगाने येथील सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात १३ जातींच्या प्रलंबित मागण्यांवर सुनावणी घेतली. तेराही जातींकडून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या जातींचा मागासवर्गात समावेश करण्यासाठी मागासवर्ग आयोगाकडे मागणी केली होती. या मागणीवर राज्य मागासवर्ग आयोगाचे सचिव दिनेश सास्तुरकर यांच्या ४ सदस्यीय सदस्यांनी या १३ जातींच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून उपस्थित जातींच्या आरक्षणाविषयीच्या मागणीवर सुनावणी घेतली. राज्य मागासवर्ग आयोगाने घडशी, कन्सारा, पटवेगर, बैरागी, चेवले गवळी, दाभोळी गवळी, शाहू वेली, नावाडी, राठोड, वळुंजु वाणी, लाडशाखीय वाणी, लाडवंजारी, रामगर्दिया सिख, कानडे/ कानडी आदी जातींना बुधवारी त्यांच्या जातींचा मागासवर्गात समावेश करण्याच्या मागणीवर सुनावणी घेतली.गासे- वनमाळी माळी जातीसंबंधी शासकीय स्तरावरील चुकीत दुरुस्ती करून गासे व वनमाळी या जातींचे विभक्तीकरण क रून दोन्ही जातींना स्वतंत्र करण्याची मागणी यावेळी पी. एम. पघड यांनी केली. तर पटवे महोम्मद यांनी अत्तार या जातीची तत्सम जात पटवे, पटवेगीर, पाटोकर या जातींचा समावेश करण्यासाठी आयोगाला निवेदन दिले. महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती-जमाती शिक्षण विकास व संशोधन संस्थेतर्फे भटक्या जमाती-ब मधील सर्वप्रकारच्या मुस्लीम धर्मीय जाती वगळून त्यांचा अल्पसंख्याक वर्गात समावेश करण्याची मागणी केली. बैरागी जातीच्या संदर्भात अखिल भारतीय वैष्ण बैरागी परिषदेने शपथपत्र सादर करण्यासाठी आयोगाकडे वेळ मागून घेतला आहे. पदाधिकाऱ्यांनी आयोगाची भेट घेऊन समस्या आयोगासमोर मांडल्या. (प्रतिनिधी)आरक्षणाची गरज : मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या अप्रगत आहे. हा समाज एकूण सर्व समाजव्यवस्थेचा राज्य व्यवस्थेचा कणा आहे. मात्र या समाजाची अवस्था आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अडचणीची झाली आहे. या समाजाला अन्य समाजाच्या बरोबरीने आणायचे असेल तर अन्य समाज व मराठा समाजात निर्माण झालेली दरी दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे ‘मनविसे’ने निवेदनात नमूद केले आहे.
मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाला साकडे
By admin | Published: April 13, 2017 12:37 AM