वाशिम: दरवर्षी विदर्भातील विविध धरणांवर तसेच अभयारण्यांमध्ये विदेशातून हजारो स्थलांतरित पक्षी येतात; मात्र यावर्षी विदर्भात पुरेशी थंडीच पडली नसल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांनी पाठ फिरविली असल्याचे पक्षिमित्रांच्या निदर्शनास आले आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी अत्यंत कमी पक्षी येथे आल्याचे पक्षिमित्रांच्या निदर्शनास आले आहे. उत्तर ध्रुवावरील देशांमध्ये बाराही महिने थंड वातावरण असते. या देशांमध्ये अनेक प्रजातींचे पक्षी वास्तव्य करतात. हिवाळ्यात या भागात बर्फवृष्टी होते व सर्व जमीन बर्फाने आच्छादली जाते. त्यामुळे पक्ष्यांना अन्न मिळत नाही. त्यामुळे हे पक्षी हिवाळ्यात उष्ण क टिबंधीय प्रांताकडे स्थलांतर करतात. त्यापैकी काही पक्षी विदर्भात येतात. हिवाळ्यात या भागात थंडी असल्यामुळे त्यांना अनुकूल अधिवास मिळतो. यादरम्यान येथील तळ्यांवर पाणी असते, सर्वत्र निसर्ग बहरलेला असतो. पाणपक्षी व जंगलात राहणार्या पक्ष्यांना मुबलक अन्न उपलब्ध असते. चार महिने वास्तव्य केल्यानंतर हे पक्षी परत जातात. विदर्भात दरवर्षी युरोप, मंगोलिया, सायबेरिया या देशातून पक्षी स्थलांतर करतात. यामध्ये प्रामुख्याने बारहेडेड बूथ, शॉवेलर, पिन्टेल, टफ्टेड डक, कॉमन पोचार्ड या पक्ष्यांचा समावेश आहे. जवळपास ७0 ते ८0 प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून विदर्भात येतात. यावर्षी मात्र विदर्भात डिसेंबर महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू झाला तरी थंडी पडली नाही. तापमानात अजूनही म्हणावी तशी घट आली नाही. थंडी पडण्याला उशीर होत असल्यामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरालाही उशीर होत असून, कमी पर्जन्यमानामुळे विदर्भातील जलसाठय़ात कमालीची घट झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पक्षी आल्याचे पक्षिमित्र तथा वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन समितीचे मिलिंद सावदेकर यांच्यासह पक्षिमित्रांच्या निदर्शनास आले आहे. या संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही बाब निदर्शनास आली आहे. दरवर्षी वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी तलावावर समुद्र किनारी राहणारे फ्लेमिंगो पक्षी स्थलांतर करून येथे पंधरा दिवस वास्तव्य करीत असतात. फ्लेमिंगो हे दुर्मीळ पक्षी असून, सहसा आढळत नाहीत. गतवर्षी जिल्हय़ातील एकबुर्जी तलावावर १५६ फ्लेमिंगो पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती. यावर्षी मात्र केवळ आठच पक्षी निदर्शनास पडले आहेत. त्यामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरावर वातावरणाचा परिणाम झाल्याचे जाणवत आहे. विदर्भाच्या पक्षीवैभवासाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे.
स्थलांतरित पक्ष्यांनी फिरविली विदर्भाकडे पाठ
By admin | Published: December 25, 2015 3:13 AM