चिपळूण : ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टिपर्पज को - आॅप. सोसायटी या पर्यटन संस्थेतर्फे रविवार, २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत गोवळकोट धक्क्यासमोरील एका निसर्गसुंदर बेटावर (आयलँड पार्क) बॅकवॉटर फेस्टिवल अॅण्ड क्रोकोडाईल सफारी महोत्सव रंगणार आहे. त्याचा शुभारंभ २७ रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते व खासदार हुसेन दलवाई यांच्या उपस्थितीत होणार आहे. ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेने नियोजनपूर्वक या महोत्सवाचे आयोजन केले असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे या महोत्सवाला सहकार्य लाभत आहे. कोकणला लाभलेले निसर्गसौंदर्याचे वरदान, नितांत सुंदर वाशिष्ठी खाडी, खाडीतील छोटी मोठी बेटे, बाजूला इतिहासाची साक्ष देणारा गोवळकोट किल्ला, सह्याद्रीचे छोटे मोठे डोंगर अशी या भागाला नितांत सुंदर पार्श्वभूमी लाभली असल्याने पर्यटनातून या परिसराचा विकास व्हावा या हेतूने हा महोत्सव भरविण्यात आला आहे. या उद्घाटन समारंभाला आमदार सदानंद चव्हाण, आमदार हुस्नबानू खलिफे, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार रमेश कदम, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, प्रांताधिकारी रवींद्र हजारे, एमटीडीसीचे विभागीय व्यवस्थापक जगदीश चव्हाण, तहसीलदार वृषाली पाटील, जिल्हाप्रमुख सचिन कदम, कालुस्ते मजरेकाशी सरपंच अब्बास जबले, धामणदिवी सरपंच सुहास बहुतुले उपस्थित राहणार आहेत.लज्जतदार कोकणी पदार्थांची व सी फूडची चव चाखता यावी, याकरिता खास स्टॉल्सही आहेत. यानिमित्त कोकणातील पारंपरिक व सांस्कृतिक लोककला नृत्यांचे कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील निसर्ग, पर्यटनस्थळे, स्थानिक लघु कुटीरोद्योग, लोककला, कोकणी खाद्यपदार्थ यांना उत्तेजन मिळावे, बचत गटांना लाभ व्हावा, कोकणात पर्यटकांचा ओघ वाढावा, हा महोत्सवाच्या आयोजनाचा हेतू आहे. पहिल्या दिवशी दुपारी १२ ते ५.३० या वेळेत गोवळकोट येथून जलपर्यटन व क्रोकोडाईल सफारी आयलँड पार्कसह, दुपारी ३ ते ४ विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ, दि. २८ रोजी जलपर्यटन व क्रोकोडाईल सफारी, सायंकाळी ४ ते ६ लावणी व लोकगीतांवर आधारित नृत्याविष्कार, मंगळवारी सकाळी १०.३० ते ६ गोवळकोट येथून जलपर्यटन व क्रोकोडाईल सफारी, सायंकाळी ४ ते ६ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राम रेडीज, उपाध्यक्ष इब्राहिम दलवाई, सेक्रेटरी संजीव अणेराव, संचालक सुनील साळवी, सल्लागार रमण डांगे, राजा पाथरे, व्यवस्थापक विश्वास पाटील आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)दि. २७ ते २९ या कालावधीत आयलँड पार्कवर कार्यक्रमांची रेलचेल. पर्यटकांना मिळणार क्रोकोडाईल सफारीचा आनंद. विविध स्पर्धांचा होणार बक्षीस समारंभ. लावणी व लोकगीतांचा नृत्याविष्कार होणार. खासदार हुसेन दलवाई यांच्यासह अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती.ग्लोबल चिपळूण टूरिझम सोसायटीचा उपक्रम.
गोवळकोट धक्क्यासमोरील बेटावर बॅकवॉटर फेस्टिवल
By admin | Published: December 24, 2015 9:46 PM