नितिन पंडीत
भिवंडी:भिवंडीतील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची सध्या दुरावस्था झाली असून शहराला जोडणाऱ्या कारीवली ग्राम पंचायतीच्या मुख्य रस्त्याची देखील मोठी दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठंमोठे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
भिवंडी शहरालगत असलेल्या कारीवली ग्राम पंचायत येथील मुख्य रस्त्याच्या बांधणीसाठी मागील दोन वर्षां सुमारे एक कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदच्या माध्यमातून मंजूर झाला होता. त्यानुसार मागील वर्षी जून महिन्यात या रस्त्यावर सुमारे एक कोटी रुपये खर्च करून हा रस्ता बांधण्यात आला होता. मात्र त्यानंतर काही दिवसांनीच या रस्त्याची दुरावस्था होण्यास सुरुवात झाली होती. आता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याच्या ठेकेदारासह पंचायत समिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी कारीवली ग्राम पंचायत मधील स्थानिक नागरिकांनी वारंवार शासकीय यंत्रणेकडे केली आहे. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी एक कोटींचा खर्च मजूर करण्यात आला होता व ती संपूर्ण निधी देखील ठेकेदाराला पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या शिफारशीनुसार अदा देखील केली असल्याची माहिती कारीवली गावातील स्थानिक नागरिकांनी दिली आहे. तसेच ठेकेदारांवर कारवाई करावी यासंदर्भात पंचायत ग्राम पंचायत, पंचायत समिती , जिल्हापरिषद , जिल्हाधिकारी कार्यालायसह अनेक शासकीय विभागांना लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र ठेकेदारांचे राजकीय पुढाऱ्यांशी जवळीक असल्याने ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
सध्या या रस्त्याची अक्षरशा दुरावस्था झाली असल्याने आता हा रस्ता नेमकी दूरुस्थ करणार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. या रस्त्यासंदर्भात अधिक माहितीसाठी भिवंडी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दत्तु गीते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.