पुणे : एसटी महामंडळाकडून ई-तिकीटींगसाठी प्रवाशांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिली जात आहे. पण प्रत्यक्षात राज्यात एसटीची ४० टक्के ई-तिकीटींग (ईटीआय) मशीनच नादुरुस्त असल्याचे समोर आले आहे. एसटीकडे सुमारे ३८ हजार ५०० मशिन असून त्यापैकी सुमारे १५ हजार मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वापरता येत नाहीत. परिणामी, पूर्वीप्रमाणे तिकीटे द्यावी लागत आहेत.
विविध योजनांतर्गत सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठीसाठी एसटीकडून स्मार्टकार्ड दिले जात आहे. त्याच धर्तीवर ओव्हर द काऊंटर (ओटीसी) कार्ड सुरू करण्यात आले आहे. या कार्डवर प्रवाशांचे नाव, छायाचित्र अशी कोणतीही माहिती नसेल. एका खासगी कंपनीच्या एजंटकडून हे कार्ड रिचार्ज करून मिळेल. हे कार्ड बसमधील वाहकाच्या मशीनवर लावल्यानंतर प्रवासासाठीचे पैसे कार्डमधून जातील. या कार्डच्या वापरासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता भासणार नाही. पण योजना सुरू करताना एसटीने कोणतीही पुर्वतयारी केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या कार्डसाठी मशीन आवश्यक आहे. त्याशिवाय या योजनेचा लाभ सर्व प्रवाशांना मिळू शकणार नाही.
एसटीकडून खासगी संस्थेला ई-तिकीटींग मशिन, स्मार्ट कार्ड तसेच ओटीसी कार्डचे काम दिले आहे. मागील काही वर्षांपासून ही कंपनी मशिनचा पुरवठा, देखभाल-दुरूस्तीचे काम करते. पण सध्या त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहेत. एसटीकडे एकुण ३८ हजार ५३३ मशीन असून त्यापैकी १५ हजार ३७ म्हणजे ३९ टक्के मशीन बंद असल्याच्या तक्रारी महामंडळाकडे आल्या आहेत. काही दिवसांत दिवाळीनिमित्त जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यावरही याचा परिणाम होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे संबंधित संस्थेला मशिन तातडीने दुरूस्त करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
-----------
सर्वाधिक मशिन नादुरूस्त असलेले विभाग
विभाग उपलब्ध मशिन नादुरूस्त
जळगाव १८४२ ११०५
मुंबई १०७७ ७७०
रायगड १०२० ७३३
बुलढाणा ९६३ ७२६
नांदेड। ११९४ ७२९
लातुर १०७६ ७०८
-----------------------------------------
एकुण ३८,५३३ १५,०३७