‘भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस’, नाना पटोलेंची घणाघाती टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 06:03 PM2023-10-27T18:03:21+5:302023-10-27T18:03:51+5:30

Nana Patole criticized BJP: भाजपाच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. आता या सरकारचे काऊंट डाऊन सुरु झाले असून शेतकऱ्यांच्या आशीर्वादानेच केंद्रातील व राज्यातील सरकार बदलणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

'Bad day for farmers due to BJP government', Nana Patole criticized |  ‘भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस’, नाना पटोलेंची घणाघाती टीका 

 ‘भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस’, नाना पटोलेंची घणाघाती टीका 

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याकडे शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही. कांदा, सोयाबीन, धान, कापूस, डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही. भाजपाच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. आता या सरकारचे काऊंट डाऊन सुरु झाले असून शेतकऱ्यांच्या आशीर्वादानेच केंद्रातील व राज्यातील सरकार बदलणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

अकोला दौऱ्यावर असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रसार माध्यमांशी बोलत होते, ते पुढे म्हणाले की, सरकारने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे पण सरकार फक्त वीमा कंपन्या व कारखानदारांचे हित पाहत आहे, केवळ खोटे बोलणे आणि जुमलेबाजी करणे एवढेच काम भाजपाने केले आहे. भाजपा सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती आहे, सप्टेंबर महिन्यापासून पाण्याच्या टँकरची मागणी होत आहे पण सरकार दुकाष्ळ जाहीर करत नाही. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करेल आणि हिवाळी अधिवेशनातही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जातील.

भाजपा खोटे बोलून सत्तेत आला आणि जनतेला दिलेली सर्व आश्वासने विसरला. भाजपा हा जुमेलबाजी करणार पक्ष आहे परंतु आता जनता या जुमलेबाज भाजपा सरकारला कंटाळली आहे. या देशातील सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष काँग्रेसच आहे. राजस्थान, छत्तिसगड, हिमाचल प्रदेश व कर्नाटक मध्ये असलेले काँग्रेस सरकार शेतकरी, तरुणवर्ग, महिला व गरिबांच्या हिताचे सरकार आहे. या राज्यातील सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. भाजपा सरकारने १० वर्ष सत्ता भोगली पण केवळ मित्रोंचा विकास केला आता त्यांचे काऊंटडाऊन सुरु झाले असून राज्यात व केंद्रातही बदल होऊन जनतेच्याहिताचे रक्षण करणारे सरकार येईल.

महाराष्ट्राला आज उडता पंजाब करण्याचे पाप भाजपा सरकार करत आहे. नाशिकसह राज्यातील इतर भागातही ड्रग्ज मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. मुलांना ड्रग्जच्या माध्यमातून बरबाद करण्याचे काम केले जात आहे. ड्रग माफिया ललित पाटीलला ससून हॉस्पिटलमध्ये सर्व सोयीसुविधा पुरवल्या जात होत्या, मैत्रिणीला भेटण्याची परवानगीही होती. या ड्रग माफियाला सरकार पाठीशी का घालत आहे. राज्यात बेरोजगारी, महागाई हे प्रश्न आहेत, या प्रश्नांना घेऊन सरकारशी दोन हात करण्याची काँग्रेसची तयारी आहे.

Web Title: 'Bad day for farmers due to BJP government', Nana Patole criticized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.