जयदेव वानखडे, ऑनलाइन लोकमत
जळगाव जामोद
सर्व शेतकरी बांधवांच्या आशेची उत्सुकता वाढविणारी संपूर्ण विदर्भात सुप्रसिध्द असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगावजामोद तालुक्यातील भेंडवड येथील घटमांडणी आणि त्याचे भाकीत २९ एप्रिल रोजी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी जाहीर केले. त्यानुसार २०१७-१८ च्या खरीप आणि रब्बी हंगामातील पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील. परंतु अवकाळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने काही भागामध्ये पिकांची नासाडी होईल. पावसाळा देखील चांगला होईल त्यामध्ये जुन महिन्यात कमी, जुलैमध्ये जास्त, ऑगस्टमध्ये सर्वाधिक तर सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस येईल. जुन महिन्यातील कमी पावसामुळे पेरणीही मागे पुढे होईल. राजकारणाबाबत राजाची गादी ही कायम आहे राजा ही कायम आहे. परंतु गादीवरील मातीमुळे राजाचा ताण वाढेल असे सांगण्यात आले. त्यामुळे राजा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी बुरे दिनची चाहूल असेल असे मानण्यात येत आहे. परकीय राष्ट्रांच्या देशविरोधी कारवाया सुरूच राहतील. परंतु देशाची संरक्षण व्यवस्था त्यांना समर्थपणे तोंड देईल. पाऊस चांगला असल्याने जलाशय भरलेली राहतील. पृथ्वीला मात्र मोठमोठ्या संकटांचा सामना करावा लागेल. त्यामध्ये अतिवृष्टी, महापूर, भुकंप, त्सुनामी सारखी संकटे उद्भवतील. गुराढोरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवेल. तर अशा येणाºया अनेक संकटांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस येईल. तिजोरीवर प्रचंड ताण येवून देशात चलन तुटवडा भासेल, असे भाकीत वर्तविण्यात आले. त्यामुळे पिक-पाणी साधारण असल्याने शेतकºयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवड या गावी ३५० पेक्षाही जास्त वर्षापुर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी घटमांडणीची परंपरा सुरू केली. अतिशय जुना काळ आणि सर्व परिसर शेतीवर अवलंबुन असलेला अशावेळी कुठलेही दळणवळणाचे साधने नव्हती तर यंत्रणाचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे हवामान खाते म्हणजे काय आणि त्यांचे अंदाज कसे याबाबत शेतकरी अनभिज्ञ होता. अशा परिस्थितीत चंद्रभान महाराजांच्या घटमांडणीच्या भाकीताचाच आधार शेतकरी घ्यायचे तेव्हापासून ही घटमांडणी आजतागायत त्याच दृढविश्वासाने शेतकºयांसमोर मांडली जाते आणि शेतकरीही मोठ्या आशेने या मांडणीच्या आधारावर पेरणीची दिशा ठरवतो. आणि यातील बहूतांश अंदाज खरे ठरतात. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या विश्वासाला ही मांडणी पात्र राहली आहे.