महाबळेश्वर : भिलार येथील सामायिक जमीन एक महिला व तिच्या मुलाने बनावट दस्त करून विकल्याचे उघड झाले आहे. ही जमीन अभिनेता आमीर खान यांचे बंधू मन्सूर नासीर हुसेन खान व अभिनेता संजय दत्तचे वकील सी. बी. वाधवा यांची कन्या शोभा राजकुमार राजपाल यांची असून, याप्रकरणी एका वकिलासह नऊ जणांविरुद्ध पाचगणी पोलिसांत आज, शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.भिलार येथील सर्व्हे नं. ४६ अ २५ ही मन्सूर खान व शोभा राजपाल यांची एकत्रित जमीन आहे. गेली अनेक वर्षे ही मिळकत पडून असून, या मिळकतीचे मालक कायम मंबई येथे असतात. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी शोभा राजपाल या नावाने एका महिलेने खोटी कागदपत्रे जमा केली. यासाठी या महिलेने व तिच्या मुलाने कोल्हापूर येथील एका पत्त्यावर खोटे निवडणूक ओळखपत्र व आधार कार्ड तयार करून घेतले. याच बनावट कागदपत्रांच्या आधारे भिलार येथील ५५.५ आर क्षेत्र जमीन विकण्याचा निर्णय घेतला. महिलेच्या व तिच्या मुलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दिलीप परबती गोळे (रा. भोसे) व लक्ष्मण तुकाराम मोरे (रा. पाचगणी) यांनी पन्नास लाख रूपयांना जमीन खरेदी करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार एका इंग्रजी वर्तमानपत्रात शोभा राजपाल यांच्या वतीने अॅड. रामदास माने यांच्या नावे नोटीस देण्यात आली. शोभा राजपाल यांना ही माहिती मिळताच त्यांनी अॅड. माने यांच्याशी संपर्क साधला व व्यवहार न करण्याची सूचना दिली. परंतु, अॅड. माने यांनी या सूचनेकडे लक्ष न देता ठरल्याप्रमाणे १२ जानेवारीला महाबळेश्वरच्या निबंधक कार्यालयात दस्त करण्याचा निर्णय घेतला. मूळ शोभा राजपाल यांनी आपल्या वकिलाच्या वतीने अॅड. माने यांना नोटीस पाठविली आहे, तर शोभा यांचे चिरंजीव विनायक राजपाल यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात अॅड. माने यांच्यासह जमीन विकत घेणारे, विकत देणारे, साक्षीदार व ओळख देणारे अशा नऊ जणांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. भरणे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)तलाठ्यामुळे प्रकार उघडजमिनीचा मोबदला धनादेशाने न देता रोख स्वरूपात देण्यात आला. दस्त झाल्यानंतर त्याची प्रत नोंद करण्यासाठी तलाठ्यांकडे देण्यात आली तेव्हा तो खोटा असल्याचे तलाठ्यांच्या लक्षात आले. दस्तावर जमिनीचे मालक म्हणून ज्या महिलेचा फोटो आहे, त्या शोभा राजपाल नाहीतच हे लक्षात येताच तलाठ्यांनी नोंद करण्यापूर्वी सर्वांना नोटीस बजावली व हा प्रकार उघडकीस आला.
बड्यांच्या जमिनींची परस्पर विक्री
By admin | Published: January 16, 2015 10:55 PM