बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींसोबत घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप आहे. या घटनेबाबत बदलापुरात लोक रस्त्यावर उतरले होते. याच दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. या आंदोलनादरम्यान खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ANI शी बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, "महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या १० दिवसांत १२ घटना घडल्या आहेत. ठाण्यात POCSO कायद्यांतर्गत दररोज एक केस समोर येत आहे. आम्ही या सर्व वाईट गोष्टींचा विरोध करत आहोत. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात असे गुन्हे घडत आहेत."
प्रियंका यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला धारेवर धरलं आणि म्हणाल्या, "आंदोलन करणाऱ्या महिला सांगत आहेत की, त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, तर त्यांना महिलांची सुरक्षा हवी आहे. महाराष्ट्रातील महिला शक्ती कायद्याबाबत विचारत आहेत. मी स्वतः राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे की तीन वर्षे झाली आहेत, पण त्याचं काय झाल?"
१७ ऑगस्ट रोजी बदलापूरमधील एका शाळेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने चार वर्षांच्या दोन मुलींसोबत दुष्कृत्य केलं. शाळेच्या वॉशरूममध्ये मुलींशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शाळेच्या व्यवस्थापनाने मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि इतरही काही लोकांना निलंबित केलं आहे. मात्र, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप आहे.