कोल्हापूर : परभणी, बीड, कल्याण येथील घटना पाहता बदलापूर प्रकरण झाल्यानंतरही राज्याचे गृहखाते सुधारलेले नाही. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केली.आमदार पाटील म्हणाले, सरकारने सत्तेसाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केला तसा प्रयत्न ते राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी करत नाहीत. परभणी, बीड, कल्याण येथील घटना पाहता बदलापूर प्रकरण झाल्यानंतरही गृहखाते सुधारलेले नाही. कायदा-सुव्यवस्था राहिली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्याचे अर्थकारण बिघडले आहे. शिक्षकांचा पगार हाेतो की नाही याची शंका आहे. सत्तेसाठी कायपण ही भूमिका सत्ताधारी घेत असल्याने त्याचे परिणाम सध्या दिसत आहेत.
प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हातातबेळगावमधील काँग्रेसची बैठक हा एक ऐतिहासिक क्षण होता. येथे काँग्रेस कार्यकारी समितीत अनेक विषयांवर चर्चा झाली. पुढचे वर्षभराचे धोरण, भूमिका याची स्पष्टता या बैठकीत करण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाचे वारे वाहत असून अध्यक्षपदासाठी आपल्या नावाची चर्चा असल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता आमदार पाटील यांनी अशा वेगवेगळ्या चर्चा होत असल्या तरी शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात, असे सांगत या विषयाला बगल दिली.सत्ताधारी सरकार म्हणून भूमिका निभावत नाहीतविधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चिंतन, एवढ्या मोठ्या प्रमाणात या गोष्टी कशा घडल्या याचा अभ्यास करणे याचा प्रदेश काँग्रेसकडून अभ्यास सुरू आहे. यातून वेगवेगळी कारणे पुढे येत असल्याचे सतेज पाटील म्हणाले. संतोष देशमुख प्रकरणात आम्ही कुणाचीही गय करणार नाही, असे मुख्यमंत्री बोलले होते. आता याला १६ दिवस होऊनही कारवाई झालेली नाही. सभागृहात बीड, परभणी व राज्यातील इतर कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा झाली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी सरकार म्हणून जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ती दिसली नसल्याचा आरोप त्यांनी केला.