विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकप्रतिनिधी वा अधिकारी आहेत, म्हणून शेतकरी कर्जमाफी नाकारणा-या राज्य सरकारने, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या कन्येला आणि त्यांच्याच विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्या पुत्रास सामाजिक न्याय विभागाच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिला आहे.मंत्री बडोले यांची कन्या श्रुती हिने ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठात अॅस्ट्रॉनॉमी व अॅस्ट्रोफिजिक्स विषयांत पीएच.डीसाठी प्रवेश घेतला आहे. तर सचिव वाघमारे यांचा पुत्र अंतरिक्ष याने अमेरिकेतील पेनेनसिल्वेनिया विद्यापीठात सायन्स इन इन्फॉर्मेशन सीस्टिम या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे. या दोघांनाही सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्ती बहाल केली आहे.गॅसची सबसिडी आपणहून सोडण्याचे आवाहन एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असताना, स्वत: मंत्री व त्याच खात्याच्या सचिवांच्या मुलांना शिष्यवृत्ती कशी दिली जाते? असा सवाल केला जात आहे.राज्यातील अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची सुरुवात ११ जून २००३ रोजी करण्यात आली होती. त्यात सुरुवातीला पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा होती. ती वाढवित, १६ जून २०१५ रोजी वार्षिक ६ लाख रुपये करण्यात आली, पण हे करताना अनुसूचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांना जागतिक मानांकनाच्या पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत असेल तर उत्पन्नाच्या मर्यादेची अट नसेल, असे नमूद करण्यात आले. १०१ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठांसाठी ६ लाखाच्या उत्पन्नाची अट ठेवण्यात आली. बड्या लोकांच्या पाल्यांना या सवलतीचा लाभ मिळावा म्हणूनच उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्याचाच फायदा बडोले यांची कन्या, वाघमारेंचा मुलगा आणि इतर काही जणांना झाला, असे दिसते. गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन पंतप्रधान करतात. राज्याचे मुख्यमंत्री सधन शेतकºयांना कर्जमाफी नाकारण्यास सांगतात. मात्र त्यांच्याच सरकारमधील मंत्री, सचिव आपल्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीचा गैरफायदा उठवत आहेत. यातून भाजपा सरकारचा दुटप्पीपणा व दांभिकपणा स्पष्ट होतो, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली.
गुणवत्तेवरच केली निवड-श्रुती बडोले आणि अंतरिक्ष वाघमारे यांची निवड गुणवत्तेच्या निकषावरच करण्यात आली असल्याचा खुलासा, सामाजिक न्याय विभागाने पाठविला आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांची निवड करताना, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने ही निवड केली. स्वत: बडोले आणि वाघमारे या समितीपासून दूर राहिले, असा दावा खुलाशात करण्यात आला आहे.सहसंचालकाच्या मुलासही शिष्यवृत्तीचा प्रसाद-तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक दयानंद मेश्राम यांचा मुलगा समीर यालाही शिष्यवृत्तीचा प्रसाद मिळाला आहे. तो वॉशिंग्टन विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनीयरिंगचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.